तर खासदारांची वाहने फिरकू देणार नाहीत; राष्‍ट्रवादीने दिला इशारा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

आंदोलनामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले. आजचे आंदोलन हे पहिले पाऊल आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेऊन वेळीच उपाययोजना केल्या नाही तर..., असा इशारा श्री. गोटे यांनी दिला.

धुळे : ‘कोरोना’च्या संकटकाळात केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करत शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटले. याप्रश्‍नी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (१८ सप्टेंबर) आंदोलनातून दिला. 
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या नेतृत्वात कांद्याप्रश्‍नी बाजार समिती बंद आंदोलन झाले. जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष रणजीत भोसले, संदीप बेडसे, किरण पाटील, दिलीप साळुंखे, पोपटराव सोनवणे, सत्यजित शिसोदे, प्रशांत भदाणे, कुणाल पवार, नंदू येलमामे, जोसेफ मलबारी, रईस काझी, डॉ. कैलास ठाकरे, अॅड. एकनाथ भावसार, डॉ. शांताराम पाटील, डॉ.सलाम मास्टर, दादा कापुरे, एजाज शेख, सुनील भदाणे, राज कोळी आदींसह महिला कायकर्त्या सहभागी झाल्या. 

महाराष्‍ट्राचा सूड घेण्यासाठीच बंदी
आंदोलनामुळे बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले. आजचे आंदोलन हे पहिले पाऊल आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेऊन वेळीच उपाययोजना केल्या नाही तर..., असा इशारा श्री. गोटे यांनी दिला. ते म्हणाले, की केंद्र सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कांदा नगदी पीक आहे. त्यातून थोडेफार पैसे शेतकऱ्यांना मिळतात. केंद्राने संकटकाळात त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहेत. महाराष्ट्राचा सूड घेण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू केल्याचा आरोप श्री. गोटे यांनी केला. श्री. बेडसे यांनी केंद्राच्या शेतकरीविरोधी निर्णयाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले असून निर्यात बंदी उठवली नाही तर खानदेशात आंदोलन छेडू, खासदारांची वाहने मतदारसंघात फिरकू देणार नाही, असा इशारा दिला. 

नंदुरबारला ‘कांदा फेको’ आंदोलन 
‘व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशी टीका करीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कांदा निर्यात बंदी उठविण्याचा मागणीसाठी नंदुरबारात रस्त्यावर कांदे फेकून आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळालाकडून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन सादर करण्यात केले. त्यात म्हटले, ‘व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशी भूमिका केंद्र सरकारकडून सातत्याने घेतली जात आहे. शेतकऱ्याला कांद्याच्या भाव चांगला भेटत असतानाच केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीवर निर्यात बंदी लावली. लाखो टन कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत असून, निर्यात बंदीचे कारण देऊन व्यापारी कवडी मोलाच्या भावने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारने तातडीने कांद्यावरिल निर्यात बंदी उठवावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 
याप्रसंगी ज्येष्ठ नेते उदेसिंग पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, मोहन शेवाळे, सीताराम पावरा, योगेश पाटील, राकेश जाधव, बबलू कदमबांडे, रवी सोनवणे, वामन पिंपळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule rashtrwadi congress strike in onion ban niryat