शेतकऱ्यांनो आत्मविश्वासाने तक्रार नोंदवा, आम्ही पाठीशी आहोत

धनंजय सोनवणे
Friday, 13 November 2020

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर राहणार आहोत. विशेषता व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणुक थांबवण्यासाठी आणि व्यापाऱ्यांकडे अडकलेले घामाचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील

साक्री (धुळे) : जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा नेहमीच विविध संकटांचा सामना करत असतो. आपण लहानपणापासून शेतकऱ्यांचे हे हाल बघत आलो असल्याने आणि स्वता देखील शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्याविषयी आपणास आस्था आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर राहणार आहोत. विशेषता व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणुक थांबवण्यासाठी आणि व्यापाऱ्यांकडे अडकलेले घामाचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, यासाठी शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने याबाबतच्या तक्रारी स्थानिक पोलिसात कराव्यात. शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करण्याच्या माझ्या सर्वाना सूचना असून, माझ्यासह सर्व अधिकारी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली.
साक्री येथील बालआनंदनगरी येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमप्रसंगी विशेष महानिरीक्षक डॉ. दिघावकर बोलत होते. याप्रसंगी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे, सचिव अड.गजेंद्र भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, पोलीस पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे सात कोटी मिळवून दिले
शेतकरी संवादात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या फसवणुकीच्या समस्या मांडल्या. यावर डॉ. दिघावकर म्हणाले कि शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या संदर्भात कारवाई करताना अनेकवेळा आधी अॅक्शन नंतर सेक्शन अशी पद्धत ठेवावी लागते. यातून गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकलेले सुमारे सात कोटी रुपये मिळवून दिले आहेत. तसेच विविध 213 व्यापाऱ्यांकडे अडकलेले आणखीन पाच कोटी रुपये देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या फसवणुकीला प्रभावीपणे कायदेशीर आळा बसावा यासाठी महाराष्ट्रात लवकरच एक विशेष कायदा तयार होत असून, हा कायदा असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. तसेच यापुढे परराज्यातील व्यापाऱ्यांना आधी स्थानिक पोलिसात नोंद करून सर्व कागदपत्र जमा करावे लागणार आहेत, यामुळे देखील फसवणूकचे प्रमाण कमी होणार आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कसमादे ‘सा’
यावेळी विविध संस्था, संघटना यांच्यातर्फे डॉ. दिघावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावर मातृभूमी असणाऱ्या साक्री तालुक्यातील सन्मानाचा अभिमान असल्याचे सांगत यापुढे कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) यासोबतच आपण “सा” (साक्री) देखील यात जोडणार असल्याचे सांगितले. आपल्या भागातील शेतकरी, शेतकऱ्यांची मुल यांच्या अडचणी तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत अधिकाधिक यश मिळवावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी सांगितले.

विभागीय आढावा बैठक
दरम्यान शेतकरी संवाद मेळाव्यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी धुळे ग्रामीणची विभागीय आढावा बैठक पोलीस ठाण्यात घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. यात कायदा व सुव्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule sakri dighavkar statement farmer complent