साक्री पश्चीम पट्टयात पिकतोय मणिपूरचा प्रसिद्ध काळभात ! 

भिलाजी जिरे
Tuesday, 3 November 2020

बहुउपयोगी भाताचे उत्पन्न पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी घेऊ लागले आहेत. कृषी क्षेत्रातील हा नावीन्य बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग बनेल.

वार्सा ः लुपिन फाउंडेशन धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच उत्पन्न वाढीसाठी विविध मार्गांनी मदत करत असते, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने एक नवीन उपक्रम साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू केला आहे. विविध प्रथिने आणि पोषणतत्त्वे असलेला, ग्लूटेनचे नगण्य प्रमाण असलेला मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त, जीवस्त्व ई, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असलेला काळभात यावर्षी पहिल्यांदाच साक्री तालुक्यातील रोहोड, कुडाशी व उमरपाटा या परिसरातील पाच गावातील वीस शेतकऱ्यांनी पिकविला आहे. 

आवश्य वाचा- टोलप्लाझाचा अजब तर्क; अपघाताचे खापर फोडले फुलझाडांवर आणि केली कत्तल !

या करिता लुपिन फाउंडेशन धुळे ने प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर लागवड साठी मोफत बियाणे चे सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदय रोग टाळता येऊ शकतो. शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी करता येऊ शकते. असा हा बहुउपयोगी काळ भात पिकण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पन्न येते, जे नियमित भात पिकापेक्षा कमी आहे, परंतु या भाताला भाव मात्र नियमित मागणी असलेल्या भातापेक्षा ४ ते ५ पट मिळते. 

आशा या बहुउपयोगी भाताचे उत्पन्न पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी घेऊ लागले आहेत. कृषी क्षेत्रातील हा नावीन्य बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग बनेल असा विश्वास लुपिन फाउंडेशनचे जिल्हा प्रकल्प समनव्ययक योगेश राऊत व नीलेश पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी संस्थेचे राजेंद्र पगारे व मनोज एखंडे हे प्रयत्नशील आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule sakri is growing in the western belt of manipur's famous kalbhat