
एखादा नैसर्गिक डोंगर कोणाच्या मालकीचा असू शकतो का? तो विकण्याचा कोणाला अधिकार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोनगीर ः आजूबाजूला डोंगर मागे भव्य सुवर्णगिरी किल्ला, टेकड्यांमधून वाट काढत जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग व लगतच सोनगीर गाव. कोणत्याही मार्गाने आले तरी प्रत्यक्षात गावाच्या सीमेवर पोहचल्याखेरीज न दिसणारे जणू एखादे हिल स्टेशन वाटणारे सोनगीर. मात्र यातील एखादे डोंगरच नष्ट झाले तर अवघ्या गावाचे सौंदर्य लयास जाण्याची भिती आहे. आणि सध्या हीच भिती ग्रामस्थांना वाटत असून धुळ्याकडून गावात येतांना प्रवाशांना जणू काही वाकून नमस्कार करीत स्वागत करणारा पहिलाच सबरगड नावाचा डोंगर विक्री होऊन तोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आणि हाच विषय चौकाचौकात चर्चिला जात आहे.
वाचा- बालाजी रथ कोसळला म्हणून बारा वर्षाचा होता खंड; आता पुन्हा रथयात्रा रद्द
एका रात्रीत सबरगडाशेजारी लाल रंगाच्या सिमेंटच्या विशिष्ट खुणा गाडल्या गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सोनगीर हे गाव पुरातन डोंगर व किल्ल्यांचे चेगाव म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र मुंबई आग्रा महामार्गाला लागून व पोलीस ठाण्याच्या समोर असलेला सबरगड डोंगराच्या आजूबाजूला खुणा लावण्यात आल्याने डोंगर विकला गेल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत अनेकांनी मोबाईलवरून विचारणा केली. यावर शहनिशा करण्यासाठी अनेक अधिकारी, गावतील पदाधिकाऱयांना विचारले.
कोणाला काहीच माहिती नाही
डोगर विक्रीला या चर्चेबाबत ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांना विचारले असता मला काहीच माहिती नाही असे सांगितले. तलाठी जितेंद्र चव्हाण यांनी सबरगडाशेजारील जागा सुलतानशहा फकीर यांच्या नावाची 10. 89 हेक्टर जमीन निघाल्याचे जुने दस्ताऐवज निघाल्याचे व या जागेवर त्यांनी दावा केल्याचे सांगितले. मात्र डोंगर विक्री बाबत कानावर पडले असून अद्याप तशा व्यवहाराचे कागदपत्रे हाती आले नसल्याचे सांगितले. मंडळ अधिकारी राजपूत यांनी सांगितले की डोंगर विकता येत नाही आणि कोणी विकू किंवा घेऊ शकत नसल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी यांनी हा डोंगर धुळ्यातील काहींनी घेतला असल्याचे ऐकले आहे असे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी यांचे पती ज्ञानेश्वर चौधरी यांनीही डोंगर विक्री झाल्याचे फक्त ऐकले मात्र खरे खोटे माहित नसल्याचे सांगितले. तहसीलदार किशोर कदम यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून माझी बदली झाल्याने मी चार्ज सोडल्याचे सांगितले.
आवश्य वाचा- धोका टळलेला नाही, सर्व नियम काटेकोरपणे पाळा : जिल्हाधिकारी यादव
साडेतीन कोटीला टेकडी विकली ?
मात्र ग्रामस्थांमध्ये टेकडी साडेतीन कोटी रुपयाला विकली गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अवैध रित्या डोंगर फोडून मुरूम विकण्याचा व्यवसाय येथे व परिसरात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच टेकड्यांचा पाया खोदून धोकेदायक स्थिती निर्माण झाली आहे. असाच मुरूम विक्रीसाठी डोंगर विकला जात असल्याचे चित्र आहे.
सबरगडाभोवती या खूणा कशाचा?
एखादा नैसर्गिक डोंगर कोणाच्या मालकीचा असू शकतो का? तो विकण्याचा कोणाला अधिकार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे