esakal | ‘एटीएम'वर चोरट्यांची पुन्हा वक्रदृष्टी; पण प्रयत्‍न फसला 
sakal

बोलून बातमी शोधा

atm robbery

देवपुर भागात गोंदूर विमानतळ रोडवरील बोरसे नगरमध्ये सकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास अज्ञातांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

‘एटीएम'वर चोरट्यांची पुन्हा वक्रदृष्टी; पण प्रयत्‍न फसला 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरातील देवपूर भागातील काही एटीएमवर आज (ता.१३) चोरट्यांची वक्रदृष्टी गेल्याचे समोर आले. गोंदूर विमानतळ रोड भागातील बोरसे नगरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणी पश्‍चिम देवपूर पोलिसांनी पाहणी केली. एटीएममधुन रोकड लंपास झाल्याचे आढळून आले नाही. दरम्यान, देवपूर भागातच आणखी दोन ठिकाणचे एटीएमदेखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याची शहरात चर्चा होती. 

शहरात विविध बॅंकाचे एटीएम फोडण्याच्या घटना अधून-मधून समोर येतात. काही दिवसांपूर्वीच असा प्रयत्न झाला होता. त्यातच आज (ता.१३) शहरातील देवपुर भागात गोंदूर विमानतळ रोडवरील बोरसे नगरमध्ये सकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास अज्ञातांनी एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, एपीआय सय्यद व कर्मचाऱ्यांचे पथकाने पाहणी केली. पाहणीत एटीएममधुन रोकड लंपास झाल्याचे आढळून आले नाही. याप्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती. 

आणखी एका एटीएमची चर्चा
दरम्यान, देवपूर भागातच नुरानी मस्जिदजवळ तसेच स्वामी नारायण मंदिर रोड भागातही एटीएम फोडल्याची चर्चा होती. याला पोलिसांकडून मात्र दुजोरा मिळाला नाही. नुरानी मस्जिदजवळदेखील एसबीआयचेच एटीएम आहे. या एटीएमच्या ठिकाणी वायर तोडल्याची मात्र माहिती मिळाली. स्वामी नारायण मंदिर रोडवरील एटीएमबाबत मात्र तशी माहिती समोर आली नाही, चर्चा मात्र होती. शहरातील एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न आज फसल्याचे दिसून आले. दरम्यान, बोरसे नगरमधील जे एटीएम आज फोडण्याचा प्रयत्न झाला तेच एटीएम काही महिन्यांपूर्वीदेखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे नागरिकांनी सांगितले. शहरातील एटीएम फोडण्याचे प्रयत्न आज अयशस्वी झाले असले तरी अशा घटनांमुळे नागरिकांमध्येही चोरी, दरोड्यांची दहशत कायम आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्तीसह आवश्‍यक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image