esakal | संमतिपत्र देऊनही निम्मे विद्यार्थी गैरहजर 
sakal

बोलून बातमी शोधा

school reopen

कोरोना संकटामुळे गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वीच हे वर्ग सुरू झाले. 

संमतिपत्र देऊनही निम्मे विद्यार्थी गैरहजर 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या येथील महापालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सोमवारी (ता. १४) सुरू झाल्या. कोरोनाची संसर्गाची धाकधूक कायम असल्याने संमतिपत्र देऊनही निम्म्यावर पालकांनी आपल्या पाल्याला पहिल्या दिवशी शाळेत पाठविले नाही. महापालिका क्षेत्रात एकूण ९१ पैकी ६६ शाळा सोमवारी सुरू झाल्या. 
कोरोना संकटामुळे गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वीच हे वर्ग सुरू झाले. 
दरम्यान, धुळे महापालिका क्षेत्रातील शाळा सोमवार (ता. १४)पासून सुरू करण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार मनपा क्षेत्रातील ९१ पैकी एकूण ६६ शाळा मुख्याध्यापक व पालकांच्या संमतीने सुरू झाल्या. शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत त्या-त्या शाळांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश होते. त्यानुसार शाळा, वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन, मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, थर्मल स्क्रीनिंग आदी विविध उपाययोजनांची खबरदारी शाळांमध्ये घेण्यात आली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. 
 
निम्मेच विद्यार्थी उपस्थित 
महापालिका क्षेत्रात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण ९१ शाळा आहेत. त्यातील ६६ शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. या सर्व ६६ शाळा सोमवारी नियोजनाप्रमाणे उघडल्या. एकूण पाच हजार ६४७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतिपत्र दिले होते. त्यापैकी दोन हजार ६०८ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली. मनपा क्षेत्रातील एकूण ९१ शाळांमध्ये नववी ते बारावीचे एकूण १८ हजार ४०९ विद्यार्थिसंख्या आहे. दरम्यान, शाळांकडून पालकांचे संमतिपत्र प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image