esakal | आजीबाईंना दत्तक घेऊन नातींनी हाती दिली सरस्वती
sakal

बोलून बातमी शोधा

literate India campaign

आजीबाईंना दत्तक घेऊन नातींनी हाती दिली सरस्वती

sakal_logo
By
सचिन पाटीलशिरपूर : तिसरी पिढी घराण्याचा उद्धार करते, असे म्हटले जाते. एका वेगळ्या अर्थाने पिळोदा (ता. शिरपूर) येथील विद्यार्थिनींनी (Student) ही उक्ती सार्थ करून दाखवली आहे. परिस्थितीमुळे निरक्षर राहिलेल्या आपल्या आजींना दत्तक घेऊन त्यांना मुळाक्षरांचे धडे देण्यास तिघा विद्यार्थिनींनी सुरवात केली आहे. नातींच्या हस्ते सरस्वती स्वीकारून साक्षर (Literate) होण्यास आजीबाईंनी (Grand Mother) आनंदाने तयारी दर्शवली.

हेही वाचा: कृषी मंत्री दादा भुसेंनी चाळिसगाव अतिवृष्टी भागाची केली पाहणी


पिळोदा येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ८ सप्टेंबरला परिसरातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचा वसा विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपापल्या घरांचा आढावा घेतला. त्यात बहुतांश घरांमध्ये आजीबाईंचे प्राथमिक शिक्षणही झाले नसल्याचे आढळले. ज्या थोड्याफार शिकल्या, त्या सरावाअभावी अडखळल्या. त्यामुळे आपल्या घरापासूनच साक्षरतेच्या प्रसाराची सुरवात करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला. त्यात दहावीची विद्यार्थिनी रोशनी पाटील हिने आजी मीराबाई, दिव्या पाटील हिने आजी शांताबाई, तर आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी करनकाळ हिने आजी यमुनाबाई यांना या शैक्षणिक उपक्रमासाठी दत्तक घेतले. साक्षरता दिनापासूनच त्यांना पाटीवर सरस्वती, मुळाक्षरे गिरवून देत अक्षरओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींना मुख्याध्यापक ए. एच. जाधव, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख के. ए. गोपाळ, आर. एस. शिरसाठ, आर. पी. देवरे, एस. बी. पाटील, पी. ए. कोळी, एम. वाय. पाटील, एस. एस. बोरसे, आर. डी. राजपूत, राजू भिल, चेतन पाटील, मनीष खैरनार यांनी उत्तेजन दिले.

हेही वाचा: गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षित


शैक्षणिक गुणवत्तेसह समाजाभिमुख उपक्रमांसाठी संस्थेतर्फे नेहमी उत्तेजन व सहकार्य दिले जाते. पिळोदा विद्यालयाने राबवलेल्या उपक्रमातून गावातील महिला साक्षर झाल्या, तर त्यासारखी आनंदाची बाब दुसरी नाही. या उपक्रमासाठी सहर्ष शुभेच्छा.
राजगोपाल भंडारी, उपाध्यक्ष


परिस्थिती, तत्कालीन रूढी यामुळे शिक्षणाला मुकलेल्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. आज वृद्धत्वाकडे झुकलेल्या या महिलांना नातींकडून शिक्षण मिळत आहे ही अत्यंत सुखद बाब आहे. एक स्त्री शिकली, तर सर्व कुटुंब शिकते हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या मोहिमेसाठी आमच्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल.
-योगेश बोरसे, उपसरपंच

loading image
go to top