शिवसेनेने काढली अंत्‍ययात्रा; सोबत मोटारसायकली ढकलल्‍या

निखील सुर्यवंशी
Saturday, 12 December 2020

राज्यात पेट्रोलचे दर ९० रूपयांवर पोहोचले आहेत. डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहेत. महागाईमुळे गृहीणींसह सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होत चालले आहे.

धुळे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेध करत शिवसेनेने शहरात शनिवारी (ता. १२) केंद्र सरकारची मुख्य बाजारपेठेतून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. नंतर महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. दरवाढीस केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्यात फेरबदलाची मागणी केली. 

शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशिल महाजन, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. पंकज गोरे, महेश मिस्तरी, तालुकाप्रमुख चंद्रकांत म्हस्के, गुलाब माळी, तालुका संघटक देवराम माळी, राजेंद्र पाटील, संदीप सूर्यवंशी, उपमहानगर प्रमुख नंदलाल फुलपगारे, कुणाल कानकाटे, धनराज पाटील, रवींद्र काकड, विकास शिंगाडे, पुरुषोत्तम जाधव, उपतालुकाप्रमुख नाना वाघ, विभागप्रमुख गितेश पाटील, रामदास कानकाटे, प्रवीण पाटील, विक्रम पाटील, राजेश पाटील, राजेश पटवारी, विलास चौधरी, राज माळी, संदीप चव्हाण, आबा भडागे, एजाज हाजी, अरुण लष्कर, पंकज भारस्कर आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. 

महागाईचा उच्चांक रोखणार का?
राज्यात पेट्रोलचे दर ९० रूपयांवर पोहोचले आहेत. डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहेत. महागाईमुळे गृहीणींसह सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होत चालले आहे. केंद्रातील भाजप सरकारने निवडणुकीवेळी पेट्रोलचे दर कमी करू, गरिबांना आधार देऊ, अशी अनेक आश्वासने देत मते मिळविली. मात्र, प्रत्यक्षात महागाईचा उच्चांक रोखण्यास केंद्र सरकार अपशयी ठरले आहे. त्यामुळे संपर्क नेते थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याची माहिती आंदोलकांनी दिली. 

मोटारसायकल ढकलत निषेध
आग्रा रोडवरील मनोहर चित्रपटगृहापासून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरूवात झाली. आंदोलनात अनेकांनी मोटारसायकल ढकलत नेत इंधन दरवाढीचा निषेध केला. संपर्क नेते थोरात, जिल्हाप्रमुख माळी, ॲड. गोरे आदींनी खांदा दिला. महानगरप्रमुख पाटील यांनी तिरडी धरली. आग्रा रोडमार्गे अंत्ययात्रा जुन्या महापालिकेसमोर पोहोचली. तेथे केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधी घोषणा दिल्या. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule shiv sena has organized a funeral procession in central goverment