उमेदवार निवडीचा निर्णय होणार जातपंचायत बैठकीत

एल. बी. चौधरी
Monday, 14 December 2020

कितीही बदलाचा प्रयत्न केला तरी ग्रामपंचायत निवडणूक जातीपातींवर खेळली जाते. त्यामुळे बहुतेक इच्छुकांची उमेदवारी त्यांच्या समाजाच्या होणाऱ्या बैठकीतील निर्णयावर अवलंबून असते.

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यात २१८ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, युवकांमध्ये निवडणुकीची उत्सुकता दिसून येत आहे. मतदारयादीतील हरकतींवर सुनावणीनंतर १४ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. येथे सदस्यपदाच्या १७ जागांसाठी निवडणूक होत असून, इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान अनेकांची उमेदवारी त्यांच्या जातपंचायतीच्या बैठकीत ठरते. 
जुलै ते डिसेंबर २०२० पर्यंत धुळे तालुक्यातील ७२, साक्री तालुक्यातील ४९, शिंदखेडा तालुक्यातील ६३ आणि शिरपूर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यापैकी धुळे जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना, मतदारयादी, हरकती, सुनावणी आदी कामे झाली आहेत. कोरोना संकटामुळे १७ मार्चला ही प्रक्रिया ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत थांबविण्यात आली होती. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुन्हा त्याच स्थितीवरून पुढे कामकाजास प्रारंभ झाला आहे. सरपंच आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रमावस्था आहे. 

जातीपातींवरच निवडणूक
कितीही बदलाचा प्रयत्न केला तरी ग्रामपंचायत निवडणूक जातीपातींवर खेळली जाते. त्यामुळे बहुतेक इच्छुकांची उमेदवारी त्यांच्या समाजाच्या होणाऱ्या बैठकीतील निर्णयावर अवलंबून असते. परिणामी, अनेक उमेदवार रिपिट होत नाहीत, तर वेगवेगळ्या इच्छुकांना संधी दिली जाते. लवकरच सामाजिक बैठकांना सुरवात होईल. शुक्रवार (ता. ११)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांनी मतदारयाद्या मिळवल्या आहेत. 

प्रभागातील मतदारसंख्येत बदल 
आधी जाहीर झालेल्या मतदारयादीत शेकडो मतदारांचे प्रभाग बदलले गेल्याने अकरा ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्यानंतर सुनावणी होऊन मतदारयादीतील घोळ दूर करण्यात आला आणि नवीन मतदारयादी तयार झाली. त्यानुसार येथे सहा हजार १२२ पुरुष, पाच हजार ९७१ महिला मतदार असून, एकूण १२ हजार ०९३ मतदार आहेत. 

प्रभाग क्रमांक पुरुष महिला एकूण 
१) ९१६ ९७१ १,८८७ 
२) १,१९५ १,१४७ २,३४२ 
३) ५९८ ६१२ १,२१० 
४) ९५५ ९५७ १,९१२ 
५) १,११० ९८९ २,०९९ 
६) १,३४८ १,२९५ २,६४३ 

एकूण ६,१२२ ५,९७१ १२,०९३ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule songir gram panchayat election candidate selection