सव्‍वा लाखाची करवसुली एकाच दिवसात; नळजोडणी खंडित

एल. बी. चौधरी
Saturday, 7 November 2020

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. तसेच लाॅकडाउनमुळे ग्रामपंचायतीला करवसुली करता आली नाही. ग्रामस्थांवरील विविध करांची थकबाकी तब्बल एक कोटीवर गेली आहे.

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामपंचायतीने शुक्रवारपासून करवसुली सुरू केली असून, कर न भरणाऱ्यांची नळजोडणी खंडित करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल सव्वा लाख रुपये जमा झाले, तर पाच कुटुंबांची नळजोडणी खंडित करण्यात आली. ही कारवाई येथील ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी केली. 
कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. तसेच लाॅकडाउनमुळे ग्रामपंचायतीला करवसुली करता आली नाही. ग्रामस्थांवरील विविध करांची थकबाकी तब्बल एक कोटीवर गेली आहे. ग्रामपंचायतीतील सफाई, पाणीपुरवठा, स्वच्छता, इतर कर्मचारी, लेखनिक आदींचे वेतन थकले आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांनी घरपट्टी, नळपट्टी, इतर कर ५ नोव्हेंबरपर्यंत भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा थकबाकीवर दंड आकारण्यात येईल, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासक कल्पेश वाघ व ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी दिली. तशी गावातून ध्वनिक्षेपकाद्वारे दवंडीही दिली. तरीही करभरणा करण्यास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारपासून कारवाईला सुरवात झाली. 

नळजोडणी खंडित
सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत घरोघरी जाऊन वसुली करण्यात आली. पाच कुटुंबांनी कर न दिल्याने नळजोडणी खंडित करण्यात आली. एक लाख २६ हजार ८३८ रुपये जमा झाले. या कारवाईत ग्रामविकास अधिकारी बोरसे, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास बडगुजर, दिलीप माळी, शुभम कासार, राजेंद्र माळी, यशवंत ढिवरे, आनंदा माळी आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, अव्वाच्य सव्वा वीजबिल भरल्यानंतर ग्रामपंचायतीचा कर भरताना ग्रामस्थांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. 
 
ग्रामपंचायतीने करवसुलीबाबत सूचना देऊनही फारशी वसुली न झाल्याने कारवाईचेे पाऊल उचलावे लागले. वसुलीच नसल्याने ग्रामपंचायतीची तिजोरी खाली झाली आहे. कोरोना काळात करवसुली झाली नाही. मात्र, आता दररोज वसुली होईल. कारवाई होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी कराचा भरणा करून सहकार्य करावे. 
-उमाकांत बोरसे, ग्रामविकास अधिकारी, सोनगीर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule songir gram panchayat tax recovery