esakal | कंटेनरमध्ये कोंबल्‍या होत्‍या ७५ गायी; नऊचा मृत्‍यू, बाकींना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

police action transport cowpolice action transport cow

मध्यप्रदेशमधून गायी भरून धुळ्याकडे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना पहाटे मिळाली. त्यानुसार सकाळी साडेसहालाच सहाय्यक निरीक्षक पाटील व सहकाऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर टोलप्लाझावर बंदोबस्त लावला.

कंटेनरमध्ये कोंबल्‍या होत्‍या ७५ गायी; नऊचा मृत्‍यू, बाकींना जीवदान

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : मध्यप्रदेशातून कंटेनर ट्रकमध्ये धुळ्याकडे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ६५ गायींना येथील पोलिसांनी जीवदान दिले. ही घटना आज सकाळी घडली. गायीसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गायींना दाटीवाटीने व निर्दयपणे कोंबण्यात आल्यामुळे नऊ गायींचा मृत्यू झाला. कंटेनर ताब्यात घेण्यात आला असला तरी संशयित वाहन चालक व दुय्यम चालक फरार झाले आहेत.
मध्यप्रदेशमधून गायी भरून धुळ्याकडे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना पहाटे मिळाली. त्यानुसार सकाळी साडेसहालाच सहाय्यक निरीक्षक पाटील व सहकाऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर टोलप्लाझावर बंदोबस्त लावला. थोड्याच वेळात कंटेनर (युपी २१, बीएन ८३८६) येतांना दिसला. पण पोलिसांना पहाताच फास्ट टॅगचा फायदा घेत चालकाने कंटेनर सुसाट वेगाने धुळ्याकडे दामटली. 

पोलिसांनी सुरू केला पाठलाग
पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करताना चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात कळवून परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या मदतीने सोनगीर पोलिसांनी चाळीसगाव चौफुलीवर पोलिस वाहन कंटेनरपुढे आडवे केले. महामार्गावरील वाहनांच्या गर्दीत वाहनचालकासह एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. कंटेनरच्या मागे फळ्या टाकून केलेल्या दोन भागात गायींना दाटीवाटीने कोंबून दोरखंडाने बांधलेले होते. यामुळे नऊ गायींचा मृत्‍यू झाला होता.

गायी गोशाळेत रवाना
पशुवैद्यकीय अधिकारींसमोर गायी उतरविण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. कंटेनरला नवकार गोशाळा येथे आणले. एकाच कंटेनरमध्ये चार गायींसह चक्क ६५ गोऱ्हे, कालवड आढळून आले. त्यात नऊ गोऱ्हे गुदमरून मृत्यू पावले. सहा लाख ११ हजार रुपयांचे गोवंश व २० लाख रुपये किमतीचे कंटेनर असा २६ लाख ११ हजाराचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे, हवलदार विजय पाटील, मनोहर चव्हाण, शिरीष भदाणे, सुरजकुमार साळवे, संजय देवरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. त्यांना चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विलास ठाकरे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक एन. एम. सहारे तपास करीत आहेत.
 
संपादन ः राजेश सोनवणे