esakal | नवीन वसाहतीत स्‍वतःचे घर, तरीही हजारो बेघर; अकराशे घरकुलांना मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

gharkul

यापूर्वीच विविध योजनेंतर्गत हजारो घरकूले मंजूर झालेली आहेत. हजारो कुटुंबांनी अतिक्रमण करून ऐसपैस घरे बांधली आहेत. नवीन वसाहती निर्माण होऊन शेकडो कुटुंबांचे स्वतःचे घर झाले आहे. आणि तरीही ११०० कुटुंबांना घरकूल मंजूर झाल्याने एवढे बेघर कसे हा विचार करण्याचा व चौकशीचा भाग आहे.

नवीन वसाहतीत स्‍वतःचे घर, तरीही हजारो बेघर; अकराशे घरकुलांना मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनगीर (धुळे) : येथे पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत गरीब व बेघर कुटुंबांना अकराशे घरकूल मंजूर झाले, असून त्यासाठी आधार कार्ड लिंक करण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. दरम्यान यापूर्वीच विविध योजनेंतर्गत हजारो घरकूले मंजूर झालेली आहेत. हजारो कुटुंबांनी अतिक्रमण करून ऐसपैस घरे बांधली आहेत. नवीन वसाहती निर्माण होऊन शेकडो कुटुंबांचे स्वतःचे घर झाले आहे. आणि तरीही ११०० कुटुंबांना घरकूल मंजूर झाल्याने एवढे बेघर कसे हा विचार करण्याचा व चौकशीचा भाग आहे. 

ग्रामपंचायतीकडे १४०० कुटुंबांनी घरकूलासाठी अर्ज केले. त्यापैकी ११०० मंजूर झाले. अजूनही अनेक इच्छुक आहेतच. दरम्यान येथे राजीव गांधी आवास, इंदिरा आवास योजना, अल्पसंख्याक निवास योजना, मागासवर्गीयांसाठी घरकूल योजना आदी योजनेंतर्गत हजारो घरे व जागा गरीबांना मिळाली. दोन हजारांहून अधिकांनी अतिक्रमित घरे बांधली. 

घरकूले मिळविण्याचा धंदा 
खानदानी रहाते घर महागड्या किमतीत विकून बेघर असल्याचे दाखवत शासकीय घरकूल मिळवायचे. विकलेल्या पैशातून ऐश करायची असा धंदा काहींनी केला. काहींनी शासकीय घरकूल विकून पुढे अतिक्रमण करून घर बांधले. दरम्यान येथे अनेकांनी घरकूल विक्री केली. लहानशा घरकुलांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. घरकूल विकून काहींनी स्वत:च्या नावावर तर काहींनी कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे पुन्हा घरकुल मिळवली. काहींचे गावात तीन मजली इमारत असूनही घरकूल मिळवले व ते भाड्याने दिले आहे. स्वतःचे घरकूलात न राहता भाड्याने देऊन पैसा कमावणरेही अनेक जण आहेत. मात्र खरे लाभार्थी घरकूल मिळण्यापासून अद्यापही वंचित आहेत. त्यांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. घरकूल मंजूर झालेले स्वत: राहत नसतील, तर ती घरकूले सील करण्यात यावे व मुळ मालक व सध्या राहत असलेले अशा दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.. 


मंजूर अकराशे कुटुंबांची आधार कार्डावरून चौकशी होईल. खरोखरच गरजू असेल त्यालाच घरकूल मिळेल. 
-उमाकांत बोरसे, ग्रामविकास अधिकारी सोनगीर 
 

loading image