esakal | सबरगड डोंगर काढला विक्रीला; संपुर्ण गावच भडकले 
sakal

बोलून बातमी शोधा

songir sabargad hills

बाहेरगावच्या काहींनी स्वतःच्या ताब्यातील जागा फेरफार करून विक्रीची चाल खेळली आहे. प्रत्यक्षात त्यांची जागा पूर्वेला आहे, पण पश्चिमेला असलेली उताऱ्यावरील नोंदीतील मिळतीजुळती जागा शोधून ती मोजून विक्रीचा घाट घातला जात आहे. 

सबरगड डोंगर काढला विक्रीला; संपुर्ण गावच भडकले 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : सबरगड डोंगर विक्री प्रकरणी गाव भडकले असून, जागेच्या नकाशाच्या चुकीच्या वाचनाच्या घोळामुळे डोंगराच्या जागेचा वाद निर्माण झाला आहे. बिनशेती गावठाण म्हणून घोषित झालेल्या सरकारी जागेच्या उताऱ्यावरील पूर्वजांच्या नावाचा आधार घेऊन आपली नावे लावून डोंगराची जागा विक्रीचा डाव समोर आला. 
बाहेरगावच्या काहींनी स्वतःच्या ताब्यातील जागा फेरफार करून विक्रीची चाल खेळली आहे. प्रत्यक्षात त्यांची जागा पूर्वेला आहे, पण पश्चिमेला असलेली उताऱ्यावरील नोंदीतील मिळतीजुळती जागा शोधून ती मोजून विक्रीचा घाट घातला जात आहे. 

चुकीने खुणा अन्‌ जमीन बळकाविण्याचा प्रयत्‍न
सबरगड डोंगराजवळील ६५ क्रमांकाच्या गटावरील पूर्वजांची नावे कमी करून त्यांच्या वंशजांची नावे झाली. हा गट ११ हेक्टर ८८ आर एवढा आहे. हा गट १९७० ला बिनशेती गावठाण म्हणून घोषित झाला आहे. मुरूमखाण पड, डोंगरपड व पोलिस वसाहतीसाठी १५० बाय २५० मीटर जागा दिली आहे. सिटी सर्व्हे हद्दीत समाविष्ट झालेल्या गटांचे उतारे देणे शासनाने बंद केले असून, तहसीलदार स्तरावर तसे आदेश आहेत, पण या प्रकरणी आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दरम्यान, गट ६५ आणि ५२ मध्ये खुणा गाडल्या आहेत आणि ही जमीन सरकारी आहे. हा प्रकार ग्रामस्थ व शासनाची दिशाभूल करून जमीन बळकावण्याचा असून, गट ५२ मधील खुणा अतिक्रमण समजून त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी आहे. 

साडेतीन कोटीत व्यवहार
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार आदींनी डोंगर विक्री झाला किंवा नाही माहीत नसल्याचे सांगितले. त्यांनी ठामपणे होकार व नकारही न दिल्याने संभ्रम कायम आहे. सबरगड डोंगर धुळ्यातील काहींनी साडेतीन कोटी रुपयांना घेतल्याची चर्चा पसरली. येथील आर. के. माळी, राजेंद्र जाधव, एल. बी. चौधरी, प्रमोद धनगर, अनिल कासार, रोशन जैन, पी. के. शिरसाठ, जितेंद्र बागूल, आरिफ पठाण, सतीश सारजे, किशोर पावनकर, कैलास वाणी, दिनेश देवरे, निखिल परदेशी, संदीप गुजर, सोनल पाटील, केदारेश्वर मोरे, मनोहर धनगर आदींनी संताप व्यक्त करीत सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. 

अधिकाऱ्यांना जाब विचारणार 
सबरगड डोंगर विक्री प्रकरणी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. चौकाचौकांत चर्चा झाली. ‘सोनगीर वाचवा, सोनगीरला कोणी वाली आहे की नाही’, ‘आंदोलन करू’, ‘सकाळ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘ग्रामस्थांनी जागरूक झाले पाहिजे’, असे अनेक मेसेज दिवसभर विविध गटांत झळकत होते. एवढेच नव्हे, तर वाघाडी, सरवड, सार्वे, बाभळे, पिंपरखेडा, सायने, नंदाणे येथूनही संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. मात्र, याबाबत माहितीच नाही, असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे. लवकरच ग्रामस्थांची एक बैठक सोशल डिस्टन्सिंग ठेवून घेतली जाणार आहे. वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येणार आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image