esakal | वाटते देवाने पोट दिले नसते तर बरे झाले असते..
sakal

बोलून बातमी शोधा

lalit mali

हे भगवान, इंसान को दिल दे, दिमाग दे, जिस्म दे, पर ये कंबख्त पेट ना दे. पेट देना है तो भूख ना दे, अगर भूख देना हैं तो एक रोटी का इंतजाम कर. वरना तुझे इंसान पैदा करने का कोई हक नहीं...राजेश खन्नाच्या ‘रोटी’ चित्रपटातील हा डॉयलॉग ललितची कहाणी ऐकून निश्‍चितच आठवतो.

वाटते देवाने पोट दिले नसते तर बरे झाले असते..

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : सर, अभ्यासाची खूप आवड. शिकून मोठे व्हावे; अशी मनस्वी इच्छा आहे. पण पोट आडवे येते. बारा तास हॉटेलवर काम करतो. उरलेल्या वेळात शाळा, अभ्यास, झोप आदी. पण अभ्‍यासाला पुरेसा वेळ देता येत नाही. कारण पोट भरण्यासाठी काम करावे लागते..ही कहाणी आहे एकट्या पडलेल्‍या ललित माळी या युवकाची. 

कितीतरी दिवस झाले हसलाच नाही
सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहे. तिसरीला असल्‍यापासून काम करीत आहे. मायेचा हात फिरवणारे जवळ कोणी नाही. किती नातेवाईक आहेत फारसे माहिती नाही. थंडी, उन, पाऊस, आजारपण मी एकटाच सहन करतो. कितीतरी दिवस झाले; मी मनमोकळेपणाने हसलो ही नाही. ललित रवींद्र माळी (वय 15, इयत्ता 10 वी) सांगत होता. रडणे पाचवीलाच पुजलेले. ललित आता मात्र भावनाविवश न होता सांगत होता. त्याचे एक– एक शब्द हृदय पिळवटून टाकत होते. 

घर मिळाले पण त्‍यात तो एकटाच
शाळेत आधारकार्ड अपडेट करायचे म्हणून त्याच्या घरी त्‍याचे शिक्षक गेले. त्‍यावेळी त्‍याची कहाणी ऐकून त्‍यांना देखील गहिवरून आले. इंदिरा आवास सारख्या घरकूल योजनेत घर मिळालेले. वडीलांचे चार वर्षांपूर्वीच व्यसनामुळे निधन झाले; आईपण नाही. खरेतर लहानच म्हणता येईल असा फक्त एक वर्षांनी मोठा भाऊ जळगावला काम करतो. काका धुळ्याला आहे आणि ललित एकटा रहातो. 

लॉकडाउनमध्ये अनेक दिवस उपवास
घरात कोणी नसल्‍याने दोन्ही वेळचे जेवण हॉटेलवरच होऊन जाते. कोरोना काळात हॉटेल बंद असल्याने अनेक दिवस उपवास घडला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच बाहेर काम करीत असल्याने घरच्या जेवणाची चवच माहिती नसल्याचे तो सांगतो. आजारी पडलो तर मी स्वतःच जवळच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेतो. 

अन्‌ शिक्षकाच्या डोळ्यातही अश्रू 
ललीतची कहाणी ऐकून शिक्षकाच्या डोळ्यातही अश्रू आले. तो म्‍हणत होता, रात्री छताकडे पहातांना आपण या जगात एकटे असल्याची जाणीव होते. पण रडून तरी काय उपयोग? सांत्वन तरी कोण करेल? सर मला शिकावेसे वाटते. माझ्याकडे मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. दहावीतील अन्य मुलांकडून मिळेल; तेवढा अभ्यास समजून घेतो. पोटासाठी बऱ्याचदा शाळाही बुडते. पण नाईलाज आहे. कधी कधी असे वाटते की देवाने पोट दिले नसते तर बरे झाले असते. त्याचे हे बोल ऐकून डोळे भरून आले. दहावीची परिक्षा जेव्हा होईल; तेव्हा परिक्षा शुल्क व अपेक्षित वगैरेंची मदतीचे आश्वासन त्‍याच्या शिक्षकांनी दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image