esakal | मनपाचे सभापती, नगरसेवकांची पोलिस अधिक्षकांकडे धाव !
sakal

बोलून बातमी शोधा

मनपाचे सभापती, नगरसेवकांची पोलिस अधिक्षकांकडे धाव !

महापालिकेच्या परस्पर भूखंड विक्री प्रकरणी निनाद पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. या भूखंड विक्रीची तक्रार स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे व तक्रारदार पाटील यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडेही केली.

मनपाचे सभापती, नगरसेवकांची पोलिस अधिक्षकांकडे धाव !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः शहरातील मालेगाव रोडवरील महापालिकेच्या भूखंडाच्या परस्पर विक्री प्रकरणी महापालिकेचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेले. मात्र त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींसह मनपातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी (ता. २५) जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

महापालिकेच्या मालकीचा मालेगाव रोड परिसरातील सर्वे नंबर ४८३/अ/२ या मोकळ्या भूखंडाची परस्पर विक्री झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे व भाजपच्या काही नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या परस्पर भूखंड विक्री प्रकरणी निनाद पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. या भूखंड विक्रीची तक्रार स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे व तक्रारदार पाटील यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडेही केली. या प्रकरणात तक्रारदार पाटील यांच्या तक्रारीवर सुनावणी घेऊन महापालिका आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार महापालिकेचे प्रतिनिधी संजय बहाळकर व प्रकाश सोनवणे चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले. मात्र, महापालिकेच्या या अधिकाऱ्यांना तेथे दोन तास बसवून ठेवले. नंतर स्थानिक गुन्हा शाखेत नेले. तेथेही एक तास बसवून ठेवले व गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. 
 
आयुक्तांचा आदेश तरीही... 
संबंधित प्रकरणात सर्व कागदोपत्री पुरावे व महापालिकेच्या आयुक्तांचा लेखी आदेश असताना गुन्हा नोंदायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा. संबंधित भूखंड महापालिका मालकी हक्काचा असून भूमाफिया शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून करोडो रुपयाच्या शासकीय जमिनी परस्पर विकून हडप करत आहेत, संघटित गुन्हा करीत आहेत, त्यामुळे अशा संबंधितांवर मोका अंतर्गत गुन्हा नोंदवावा म्हणजे यापुढे कोणी शासकीय जमीन खरेदी करण्याचे धाडस करणार नाही. हा विषय जनहित असल्याने गुन्हा नोंदवावा, अशी मागणी श्री. बैसाणे, तक्रारदार श्री. पाटील तसेच नगरसेवक संजय पाटील, भारती माळी, मंगला पाटील, किरण अहिरराव, हर्षकुमार रेलन, किरण कुलेवार, रावसाहेब नांद्रे, अमोल मासुळे, राजेश पवार, नंदू सोनार, विजय जाधव, लक्ष्मी बागुल, वालीबेन मंडोरे, नरेश चौधरी आदींनी केली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top