
भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छडवेल-कोर्डे शिवारातील छडवेल ते दहीवेल महामार्गालगत असलेल्या हॉटेल नवरंगच्या सिमेंट विटांच्या पक्क्या घर-वजा शेडमध्ये सुमारे 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला.
निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील छडवेल- कोर्डे (ता.साक्री) शिवारात छडवेल ते दहीवेल महामार्गालगत असलेल्या हॉटेल नवरंगच्या सिमेंट विटांच्या पक्क्या शेडमध्ये सुमारे 65 लाखाचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने छापा टाकून अवैध मद्य तस्करीविरोधात ही धडक कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप, संचालिका उषा वर्मा, नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे व उपअधीक्षक श्री. भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छडवेल-कोर्डे शिवारातील छडवेल ते दहीवेल महामार्गालगत असलेल्या हॉटेल नवरंगच्या सिमेंट विटांच्या पक्क्या घर-वजा शेडमध्ये सुमारे 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला. त्यात सुमारे 1 हजार 250 दारूचे खोके व दोन वाहने असा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश आहे.
असा होता साठा
गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यू मास्टर व्हिस्कीच्या 180 मिलिलिटर क्षमतेच्या 26 हजार 400 बाटल्या असलेले 550 खोके, तर फक्त मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी असलेले किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉंग प्रीमियम बिअरचे 500 मिलिलिटर क्षमतेचे 16 हजार 800 टिन/कॅन असलेले 700 खोके अशा एकूण 65 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह संशयित मुकेश अरुण चौधरी (वय-30 वर्षे) रा.अनकवाडे, म्हसावद ता.शहादा, जि.नंदुरबार ह्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करून, त्यास अटक करण्यात आली आहे. गाड्यांचा ताफा पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
एक वाहन केले गायब
नाशिक जिल्ह्यात कारवाई सुरू असताना येथील वाहनचालकांनाही त्या कारवाईचा सुगावा लागल्याने दारूसाठा असलेले एक वाहन आधीच गायब झाल्याचे समजते. सदर अवैध मद्यवाहतुकीत मोठ्या प्रमाणावर मद्यतस्करांची मोठी टोळी सक्रीय असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, डी. एन. पोटे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी कारवाई केली. नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते पुढील तपास करीत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे