esakal | कोरोनात पुरुष मंडळीच अधिक तणावात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनात पुरुष मंडळीच अधिक तणावात ! 

राज्यातील दोन हजार ७९ व्यक्तींनी संपर्क साधला. यात ५९ टक्के पुरुष, २२ टक्के स्त्रिया, १९ टक्के तरुण होते. या क्रमात पुरुष मंडळी अधिक मानसिक तणावात असल्याचे निदर्शनास आले,

कोरोनात पुरुष मंडळीच अधिक तणावात ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे: संसर्गजन्य कोरोना आणि लॉकडाउनमधील संकटकाळात पुरुष मंडळी अधिक तणावात असल्याचा निष्कर्ष राज्य मानसशास्त्रतज्ज्ञ असोसिएशनतर्फे झालेल्या समुपदेशनातून समोर आला. तीन महिने मोफत चाललेल्या टेलिफोनिक कौन्सिलिंगअंतर्गत राज्यातील दोन हजार ७९ व्यक्तींनी संपर्क साधला. यात ५९ टक्के पुरुष, २२ टक्के स्त्रिया, १९ टक्के तरुण होते. या क्रमात पुरुष मंडळी अधिक मानसिक तणावात असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती असोसिएशनच्या सदस्या प्रा. वैशाली पाटील यांनी दिली. 

आवश्य वाचा- महाराष्ट्र हादरला : जळगावमध्ये चार चिमुकल्यांची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या !
 

अशी चिंता, असे प्रश्‍न 
समुपदेशन करताना ५७ टक्के दूरध्वनी कोरोनाबद्दल वाटणारी भीती, चिंता व्यक्त करणारे होते. यात अशा व्यक्ती अँक्झायटी डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर, डिप्रेशन या मनोविकाराला बळी पडल्या होत्या. विवेकी विचारात त्या व्यक्ती असमर्थ वाटत होत्या. पाच टक्के दूरध्वनी कोरोना झालाच आहे म्हणजे फोबिया जाणवणाऱ्या होत्या, अशा व्यक्ती अतार्किक विचाराच्या सीमा पार केलेल्या होत्या. तसेच १४ टक्के व्यक्ती अल्कोहोल यूज डिसऑर्डरच्या म्हणजे व्यसनाधीनतेचे विकार असलेल्या होत्या. शिवाय १६ टक्के तरुण, सर्वसामान्य वयोगटातील व्यक्ती रोजगाराच्या चिंतेत होत्या. अशा व्यक्ती स्ट्रेस डिसऑर्डर, ॲडजेस्टमेंट हायपरटेन्शच्या शिकार होत्या. प्रेमप्रकरणाबाबत अनेक प्रश्न होते. निरनिराळ्या प्रश्‍नांमध्ये दूरध्वनीचे चार टक्के प्रमाण मुले सांभाळताना होणारी कसरत, दोन टक्के ज्येष्ठ नागरिकांना दिनचर्या काय ठेवावी, दोन टक्के महिलांना कामाचा अतिरिक्त ताण आदींचा समावेश होता. 

प्रा. पाटील यांचा सल्ला 
या पार्श्वभूमीवर प्रा. सौ. पाटील यांनी सांगितले, की आपले विचार, भावनांच्या कोंडमाऱ्यामुळे अनेक जण नैराश्याला बळी पडत आहेत. तसेच आपल्याला कोणाचा आधार मिळत नाही, हे नैराश्‍यामागचे महत्त्वाचे एक कारण आहे. त्यामुळे लगेचच थकवा येतो. डोपामाईन हे एक न्यूरोट्रान्समीटर रसायन मेंदूत कमी असेल, तर त्या व्यक्तीच्या हालचालींवर नियंत्रण कमी होते. अशा व्यक्ती नैराश्याला बळी पडतात. औषधोपचार, कौन्सलिंगच्या बिहेविअर थेरपीद्वारे त्या या विकारातून मुक्त होऊ शकतात. व्यक्ती प्रत्यक्ष कुठल्याही गोष्टीमुळे अस्वस्थ होत नाही, तर तो त्या गोष्टीकडे कसा बघतो, कसा विचार करतो, त्यावर अस्वस्थता निर्भर असते. अस्वस्थ व्यक्ती ‘कोरोना’विषयी वाटणारी चिंता ‘सबकाँन्शस माइंड’ मध्ये साठवते. यात चिंता म्हणजे निश्चित असे कारण ठाऊक नसते, पण दिवसातील काही काळ त्या विचारात असणे म्हणजे अशा व्यक्ती ‘स्ट्रेस डिसऑर्डर’च्या शिकार असतात. सर्वेक्षणात या त्रासानेच आपले राज्य ग्रासल्याचे समोर आले. 
- प्रा. वैशाली पाटील, धुळे 
सदस्य, राज्य मानसशास्त्रतज्ज्ञ असोसिएशन.

संपादन- भूषण श्रीखंडे