esakal | धुळ्यात तपासणी सत्र; लॉकडाउन’बाबत पोलिस कठोर

बोलून बातमी शोधा

police
धुळ्यात तपासणी सत्र; लॉकडाउन’बाबत पोलिस कठोर
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीसह काही निकषांनुसार लॉकडाउन लागू केल्यावर शहरात अनेक रिकामटेकड्यांकडून आदेशाची पायमल्ली होत होती. या संदर्भात पोलिस यंत्रणा मंगळवारी ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर बुधवारी (ता. २१) आणखी कठोरतेने नियमांची अंमलबजावणी करण्यात जुंपली. चौकाचौकांत वाहनधारकांची चौकशी आणि रिकामटेकड्यांना लगाम घालण्यासाठी काही प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्सने अडथळे निर्माण करण्यात आले.

हेही वाचा: धुळ्यात वाइन शॉप उघडताच उडाली झुंबड !

शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. संसर्गाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदीसह काही निकषांनुसार लॉकडाउन लागू केला आहे; परंतु जबाबदारीचे भान ओळखण्याऐवजी रिकामटेकड्यांनी यंत्रणेचा अकारण ताण वाढविला आहे.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

मार्गांमध्ये अडथळे, कारवाई

यात सकाळी सात ते अकरापर्यंत केवळ अत्यावश्‍यक सेवा मिळत आहेत. नंतर पोलिसांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली. सकाळी अकराची वेळ टळल्यानंतर उघडी दुकाने, फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू झाले. श्री गणपती मंदिर पुलापासून नकाणे रोडकडे जाणाऱ्या मार्गावर नेमून दिलेल्या जागेत न बसल्याने भाजीपाला विक्रेत्यांना दंड आकारण्यात आला. गणपती मंदिर पूल दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला. फाशीपूल चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले. नगावबारीकडून धुळ्याकडे येणारा रस्ताही बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. संतोषीमाता चौकासह विविध मार्गांवर बॅरिकेड्स लावून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विविध चौकांत वाहनधारकांची चौकशी सुरू केली. परिणामी, शुकशुकाट दिसू लागला. समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात होती. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, आझादनगरचे निरीक्षक आनंद कोकरे, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मैन्नुद्दीन सय्यद, कर्मचारी रवींद्र हिरे, रवींद्र शिंदे, सुनील राठोड, प्रशांत पाटील, अनिल बेडसे, देवपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज कुवर व सहकारी, शहराचे उपनिरीक्षक समाधान वाघ व पथक गस्तीसह कारवाई करताना दिसले.

संपादन- भूषण श्रीखंडे