जिल्ह्यात हजारावर अध्ययन अक्षम विद्यार्थी 

जिल्ह्यात हजारावर अध्ययन अक्षम विद्यार्थी 

देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि जिल्हा रुग्णालयातर्फे "अध्ययन अक्षम निदान व प्रमाणीकरण कक्ष' सुरू झाला आहे. चार महिन्यांपासून धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन झालेल्या या कक्षात जिल्ह्यातील 21 प्रकारांतील दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

50 विद्यार्थ्यांची सखोल तपासणी 
जिल्ह्यात एक हजार 177 संशयित अध्ययन अक्षम विद्यार्थी आढळले आहेत. पैकी आतापर्यंत 50 विद्यार्थ्यांची सखोल तपासणी झाली आहे. यातील स्वमग्नता (ऑटिझम), अध्ययन अक्षमता आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना विविध उपचार पद्धतींद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमता ही लेखन अक्षमता, वाचन-आकलन अक्षमता, अंकगणित अक्षमता आणि हालचाल अक्षमता या चार प्रकारांची असते. याशिवाय "अटेंशन डेफिसिट', "हायपर ऍक्‍टिव्हिटी डिसऑर्डर' असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तसेच ते खूपच मस्ती करतात. यामुळे हे विद्यार्थी अभ्यासात मागे राहतात. मात्र, त्यांची ही समस्या वेळीच ओळखता आली आणि त्यावर योग्य उपचार झाले तर अशा विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक प्रवास सुखकर होऊ शकतो. 

निदान व प्रमाणीकरण आवश्‍यक 
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत पहिली ते बारावीतील 21 प्रवर्गांतील अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दोष, लेखन, वाचन, कौशल्यातील चुका वर्ग अध्यापनाच्या वेळी शिक्षकांना दिसून येतात. वर्गातील दैनंदिन निरीक्षणावरून प्राथमिक अंदाजानुसार संबंधित विद्यार्थी अध्ययन अक्षम आहे, असे समजण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांची योग्य चाचणी व प्रमाणीकरणाशिवाय अध्ययन अक्षम विद्यार्थी संबोधने योग्य नाही. त्यासाठी वर्ग शिक्षकांमार्फत शोध घेण्यात येऊन संशयित अध्ययन अक्षम अध्ययनार्थींचे औपचारिक मूल्यमापन निदान व प्रमाणीकरण होणे आवश्‍यक आहे. या पार्श्वभूमीवर धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हा कक्ष सुरू झाला आहे. 

अपंगत्वाचे 21 विविध प्रकार 
यापूर्वी अपंगत्वाचे नऊ प्रकार अस्तित्वात होते. मात्र, "आरपीडब्ल्यूडी' ऍक्‍टनुसार एकूण 21 विविध अपंगत्व प्रकार अस्तित्वात आले आहेत. आज समाजात अशी अनेक मुले आहेत त्यांचा बुद्‌ध्यांक सर्वसामान्य मुलांपेक्षा उच्च असतो. मात्र, काही लेखनिक, वाचनीय आणि गणितीय दोषांमुळे तो अध्ययन अक्षम या श्रेणीत मोडला जातो. असा विद्यार्थी केवळ "मायनर' अपंगत्वामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा मागे पडतो. अशा विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन 
या उपक्रमासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मदतीसाठी रिसोर्स टीचर म्हणून संजय काळमेघ, झरिना शाह यांची नियुक्ती हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बालरोगतज्ज्ञ, नाक-कान- घसातज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, दंतचिकित्सक, भौतिक उपचार, व्यावसायिक उपचार, वाचा उपचार, मनोचिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ आदी विविध वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. 

"लर्निंग डिसऍबिलिटी'विषयी वर्गशिक्षकांनी दैनंदिन निरीक्षणावरून कोणत्या विद्यार्थ्याला काय येत नाही, याची सविस्तर नोंद माहिती पुस्तिकेत घ्यावी. तसा अहवाल समग्र शिक्षाला द्यावा. यामुळे पुढील प्रमाणीकरणाला मदत होईल. पालकांमधील अज्ञानामुळे आजही त्यांच्या पाल्याला "लर्निंग डिसऍबिलिटी' आहे, याची माहितीच नाही. स्वमग्न मुलांच्या पालकांनाही स्वमग्नतेसंबंधीच्या उपचार पद्धतींची माहिती नसते. त्यामुळे साहजिकच अशा "विशेष' मुला- मुलींना आणि त्यांच्या पालकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे समानीकरण होण्यासह दिव्यांग विद्यार्थीही स्वाभिमानाने आपले आयुष्य जगतील. 
- प्रा. डॉ. जीवन पवार, विभागप्रमुख, मनोविकृती विभाग, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे 

दृष्टिक्षेपात अध्ययन अक्षम विद्यार्थी 
संशयित अध्ययन अक्षम विद्यार्थी ः धुळे तालुका- 240, साक्री तालुका- 323, शिंदखेडा तालुका- 61, शिरपूर तालुका- 41, धुळे महापालिका- 512. एकूण- 1177. 
ऑनलाइन नोंदणी झालेले विद्यार्थी ः धुळे तालुका- 215, साक्री तालुका- 113, शिंदखेडा तालुका- 6, शिरपूर तालुका- 41, धुळे महापालिका- 350. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com