धुळे तालुक्‍यात वादळासह पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

काही ठिकाणी केवळ वादळानेच हजेरी लावली. साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यातही पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी निःश्‍वास सोडला. 

धुळे : तालुक्‍यातील विविध गावांत आज काही वेळ वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यातील काढणीवर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे, झोपड्यांचे छप्परही उडाले. ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही ठप्प झाली. काही ठिकाणी केवळ वादळानेच हजेरी लावली. साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यातही पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी निःश्‍वास सोडला. 

नेर शिवारात दीड तास पाऊस 
नेर : येथे व परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वादळासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सलग दीड तास पाऊस सुरू होता. यामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला रब्बीचा घास हिरावला आहे. सध्या शेतशिवारात मका, कांदा, बाजरी, भुईमूग आदी पिकांची काढणी सुरू असून, ही पिके पावसात सापडल्याने मोठे नुकसान झाले. वादळामुळे गावातील कोळी गल्लीतील अनेक घरांचे छप्प उडाले. पावसामुळे मका पिकाचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. सध्या "कोरोना'मुळे सर्वत्र लॉक डाउन सुरू असून, दळणवळणासह सर्व व्यवहार ठप्प आहेत. या परिस्थितीत शेतकरी हवालदिल आहेत. आधीच शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना आता वादली पावसाने हजेरी लावल्याने त्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजरी, मका, कांद्याची काढणी केली असून, भुईमुगाच्या शेगांचीही तोडणी सुरू आहे. अनेकांचा शेतमाल शेतातच पडून होता. त्यातच आज पाऊस झाल्याने सर्व शेतमाल भिजला आहे. यात चाऱ्याचेही नुकसान झाले आहे. 

नवलनगर परिसरात हजेरी 
नवलनगर : येथे व परिसरात आज सायंकाळी जोरदार वादळासह 15 ते 20 मिनिटे पावसानेही हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. पावसामुळे बाजरी, मका, भुईमूग, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. तसेच चाराही ओला झाला. परिसरातील नावरा, नावरी, आर्णी परिसरातही काही वेळ वादळासह पाऊस झाला. 

न्याहळोदला वादळासह पाऊस 
न्याहळोद : येथे व परिसरात आज सायंकाळी वादळासह पावसाने हजेरी लावली. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले. येथील पेट्रोल पंपाजवळील तसेच रस्त्यावरील झाडेही कोसळल्याने काही वेळ रस्ता बंद झाला होता. काही शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून ते शेतातच उघड्यावरच ठेवले होते. पावसामुळे कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. काही शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, बाजरीचे पीक कापून ठेवले होते. पावसामुळे पिके ओली झाल्याने नुकसान झाले. तसेच चाराही ओला झाल्याने तो काळा पडण्याची शक्‍यता आहे. ऐन काढणीवेळी रब्बी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून नेल्याने शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. दरम्यान, एका झाडाखाली बसलेली मेंढपाळाची मुलगी झाड कोसळल्याने जखमी झाली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौठळसह परिसरातही आज सायंकाळी सुमारे अर्धा तास वादळासह पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे गाराही कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. धामणगावसह शिरूड, बोरकुंड, रतनपुरा, दोंदवाड परिसरातही जोरदार वादळ झाले. मात्र, पाऊस झाला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule taluka aria rain coming late night