दोन गावांत खासगी विहिरी अधिग्रहित 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

धुळे तालुक्‍यात पाणीटंचाईची फारशी तीव्रता नाही. गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे अद्याप अनेक प्रकल्पांत पुरेसा जलसाठा आहे. आता मेचा शेवटचा आठवडा सुरू असून यापुढे एखाद्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली, तर पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग उपाययोजनांसाठी तत्पर आहे. 
- जयदीप पाटील, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, धुळे 

 

सोनगीर : उन्हाळ्यात दर वर्षी पाणीटंचाईमुळे होरपळणाऱ्या धुळे तालुक्‍यात यंदा फारशी टंचाई नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्‍यातील सर्वच प्रकल्प, तलाव, बंधारे तुडुंब भरले, तर नदी-नालेही आठ ते दहा महिने दुथडी वाहत होते. यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या. तरीही प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेत उपाययोजना केल्या आहेत. यात तालुक्‍यातील 142 गावांतील 124 ग्रामपंचायतींपैकी केवळ 11 गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. त्यापैकी दोन गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, तर तीन गावांत खासगी विहिरी अधिग्रहण प्रस्तावित आहे. सहा गावांमध्ये संभाव्य स्थितीत उपाययोजना प्रस्तावित आहेत. 

यंदा प्रकल्पांत पुरेसा साठा 
तालुक्‍यातील 15 प्रमुख धरणे व तलावांत अद्यापही समाधानकारक जलसाठा आहे. मात्र, अनेक लहान बांधारे मेच्या मध्यापर्यंत कोरडे पडले आहेत. मात्र, हे बांधारे केवळ शेतीसाठी उपयुक्त असून, पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग होत नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. शिवाय परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावल्याने सर्वच लघु, मध्यम प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले. नदी-नालेही दुथडी वाहिल्याने पाणी टंचाईची तीव्रता अद्याप कुठेही फारशी जाणवलेली नाही. संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा ऑगस्ट 2019 ते जून 2020 बनविण्यात आला असून, त्यात संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून अकरा गावे जाहीर झाली आहेत. मार्च, एप्रिल व मेमध्ये या स्थितीत काहीही बदल झाला नाही. अन्य कोणत्याही ग्रामपंचायतीची मागणी नसल्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागानेही नवीन कोणतीही योजना प्रस्तावित केलेली नाही. 

विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव 
तालुक्‍यातील अंचाळे तांडा व तांडा कुंडाणे येथे खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन निकुंभे, बाबरे, नावरा या तीन गावांसाठीही खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याशिवाय कुंडाणे (वेल्हाणे), जुन्नेर, कुंडाणे (वरखेडी), जुनवणे, चिंचवार, रामनगर (नगाव) या संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाईच्या स्थितीत खासगी विहिरी अधिग्रहित करणे किंवा जुन्नेर व रामनगर येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे, चिंचवार येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम करणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. 

जलसाठ्याबाबत समाधानकारक स्थिती 
तालुक्‍यातील डेडरगाव, देवभाने, नकाणे, अंचाळे, अक्कलपाडा, सोनगीरचा तलाव, सातपायरी धरणात पुरेसा जलसाठा असल्याने यंदा पाण्याबाबत समाधानकारक स्थिती आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या आवर्तनाबाबत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय घेतला जातो. त्यामुळे अद्यापतरी पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केलेले नाही. यंदा जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज आहे. पाऊस झाल्यास जी टंचाई आहे तीही कमी होण्यास मदत होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule taluka two village water tanchai well adhigrahit