
एकाकी जीवन जगतोय. हॉटेलमध्ये काम करून दहावीचे शिक्षण घेत आहे. आई नाही, की वडील नाही. घरात एकटाच असल्याने सारे काही त्यालाच करावे लागते. त्याचे शिक्षक व अन्य काही दानशुरांनी त्याला मदतीचा हात पुढे केला. पण ही मदत घ्यायची नाही. विनम्रपणे नकार देत सर तुमची मदत नको फक्त आशीर्वाद हवा; असे बोल ललीतचे आहेत.
सोनगीर (धुळे) : एकाकी जीवन जगणाऱ्या येथील ललित रवींद्र माळी या दहावीतील विद्यार्थ्याची बातमी ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच शेकडो दानशूरांनी सहानुभूती व्यक्त करीत मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र कमी वयात खूप अनुभव घेतलेल्या ललितने विनम्रपणे मदत स्विकारण्यास नकार दिला. तो म्हणाला, 'सर फक्त तुमचे आशिर्वाद हवे. कष्ट करून मी माझे पोट भरण्यास समर्थ आहे. यापेक्षा जास्तीची मला गरज व अपेक्षा नाही.’ लोकांची मदत घेऊन तो त्याचा स्वाभिमान दुखावण्यास तयार नाही. हे लक्षात आले.
ललित माळी याचे वडील हयात नाहीत. आई नाही, काका धुळ्यात, मोठा भाऊ जळगावात आणि तो आवास योजनेच्या घरात एकटाच राहात असून हॉटेलवर काम करीत शिक्षण घेत आहे. इतर नातेवाईक कोण आहे माहित नाही. पोट भरण्यासाठी दिवसा बारावाजेपासून रात्री बारापर्यंत हॉटेलवर काम करावे लागत असल्याने कधी कधी शाळा बुडते. मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे अशक्य आहे.
मदतीचे हात सरसावले
सकाळने याबाबत बातमी प्रसिद्ध केली. तेव्हा शेकडोंनी बातमी वाचून डोळे भरून आल्याचे सांगितले. प्रत्यक्ष, मोबाईलवर, व्हॉटसअप, फेसबुकवर बातमीची देवाणघेवाण झाली. शेकडोंनी त्याला आर्थिक, शैक्षणिक व सांसारिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात येथील दलित मित्र दिलीप माळी यांनी सर्व शैक्षणिक खर्च करण्याची तयारी दर्शविली. शिवसेनेचे राज्य शिक्षक आघाडीचे विभागीय सरचिटणीस मुरलीधर मोरे व त्यांच्या मी सोनगीरकर गट अॅण्ड्राईड मोबाईल देणार आहेत.
अन् डोळ्यातून अश्रू
दरम्यान गो. पि. लांडगे यांनी पाचशे रुपये दिले. ते घेऊन ललितकडे गेलो असता त्याने ते घेण्यास नम्रपणे नकार दिला. आणि आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट दिली. तो म्हणाला सर, मला काही नको. मी माझा समर्थ आहे. मला कोणीच नाही असे वाटत होते. पण एवढ्या लोकांनी मदत देण्यासाठी हात पुढे केल्याचे पाहून मला गहिवरून आले. मी एकटा नाही. तुम्ही आहात. ही जनता आहे. यापेक्षा जास्त मला काय पाहिजे? लांडगे यांनी दिलेले पाचशे रुपये बळजबरी त्याच्या खिशात कोंबले. दहावीचा हा विद्यार्थी कमी वयात किती मोठा झाला याची जाणीव झाली.
संपादन ः राजेश सोनवणे