धुळ्यातील दहा खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

प्रशासनाने प्रथम सिद्धेश्वर हॉस्पिटल अधिग्रहीत केले आहे. यानंतर शहरातील प्रमुख दहा मल्टिस्पेशालिटी रुग्णालये अधिग्रहीत केली जातील. प्रथम अधिग्रहीत झालेल्या रुग्णालयात १५ दिवस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होतील.

धुळे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हाधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी रोटेशन पद्धतीने दहा खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी रुग्णालयांची मर्यादा लक्षात घेता बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभही दिला जाणार आहे. 
प्रशासनाने प्रथम सिद्धेश्वर हॉस्पिटल अधिग्रहीत केले आहे. यानंतर शहरातील प्रमुख दहा मल्टिस्पेशालिटी रुग्णालये अधिग्रहीत केली जातील. प्रथम अधिग्रहीत झालेल्या रुग्णालयात १५ दिवस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होतील. पंधराव्या दिवशी रुग्ण दाखल करणे थांबविले जाईल. पंधराव्या दिवशी दाखल रुग्ण पुढील सात दिवस उपचार घेऊन घरी जाईल. पंधराव्या दिवसानंतर दुसऱ्या खासगी रुग्णालयात अधिग्रहीत होईल. निवडक दहा खासगी रुग्णालयांमध्ये शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होतील. योजनेत समाविष्ट नसलेला खर्च रुग्णाला पेलावा लागेल. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू कक्ष, व्हेंटिलेटरची सुविधा असल्याने रुग्णाची सोय होऊ शकेल. 

पीपीई किट पुरविणार 
खासगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पीपीई किट पुरविले जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता जोपासली जाऊ शकेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule ten private hospital acquisition corona positive case