esakal | लॉकडाउनप्रश्‍नी ठाकरे सरकारचा दबाव...भाजपचा आरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule mahapalika

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने लॉकडाउन होऊ नये, म्हणून प्रशासनावर ठाकरे सरकारचा दबाव असल्याचा आरोप विरोधक 50 नगरसेवकांनी केला.

लॉकडाउनप्रश्‍नी ठाकरे सरकारचा दबाव...भाजपचा आरोप 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून "जनता कर्फ्यू' लागू केला जात आहे. मात्र, येथील महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने लॉकडाउन होऊ नये, म्हणून प्रशासनावर ठाकरे सरकारचा दबाव असल्याचा आरोप विरोधक 50 नगरसेवकांनी केला. या संदर्भात निर्णयासाठी महापालिका प्रशासनाला तीन दिवसांचा "अल्टिमेटम' भाजपच्या शिष्टमंडळाने दिला, अन्यथा महापालिकेच्या प्रवेशद्वारात महापौरांसह नगरसेवक उपोषण करतील. 
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिका क्षेत्रात सरासरी 12 दिवसांचा लॉकडाउन, संचारबंदी लागू व्हावी, अशी भाजपची मागणी आहे. त्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिकेत शनिवारी (ता. 4) दुपारी आयुक्त शेख यांच्याशी चर्चा केली. उपायुक्त गणेश गिरी उपस्थित होते. 

भाजपचा आरोप 
लॉकडाउन शिथिल झाल्यापासून बहुसंख्य नागरिक, विक्रेते-व्यावसायिक मास्क लावत नाहीत, शारीरिक अंतर पाळत नाही, बरेच वाहनधारक ट्रिपल सीट हिंडतात, खासगी वाहनातून अधिक प्रवासी वाहतूक करतात, अनावश्‍यक गर्दी करतात. यात सरकारी यंत्रणा, पोलिसांचा अंकुश दिसत नाही. परिणामी, येथील महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी महापौर चंद्रकांत सोनार व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा जनहितासाठी लॉकडाउन करावे, अशी मागणी केली. मात्र, ती दुर्लक्षित करण्यात आली. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महापालिका, जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून लॉकडाउनची मागणी फेटाळली जाते. ठाकरे सरकार द्वेषभावनेने मागणी नाकारत आहे, असा गंभीर आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने केला. 

तीन दिवसांची मुदत 
तीन दिवसांत मागणीनुसार निर्णय झाला नाही, तर भाजपचे नगरसेवक, इतर पक्षीय पदाधिकारी उपोषण सुरू करतील, असा इशारा उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेविका प्रतिभा चौधरी, भारती माळी, वंदना थोरात, पुष्पा बोरसे, प्रदीप कर्पे, युवराज पाटील, अमोल मासुळे, संजू पाटील, नरेश चौधरी, भगवान गवळी, सुरेखा देवरे, नागसेन बोरसे, संतोष खताळ, विजय जाधव, दिनेश बागूल आदींनी दिला. 

साखळी "ब्रेक' करायची... 
महापालिका क्षेत्रात पुन्हा 12 दिवसांचे लॉकडाउन झाले, तर कोरोनाचा फैलाव रोखता येऊ शकेल, साखळी "ब्रेक' करता येईल, अशी भाजपची भूमिका आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी चर्चा झाल्यावर निर्णय जाहीर करू, असे आयुक्त शेख यांनी सांगितले. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाची स्थिती 
आतापर्यंत एकूण रुग्ण ः 595 
उपचार घेणारे रुग्ण ः 139 
कोरोनामुक्त रुग्ण ः 426 
मृत रुग्ण ः 31 

जिल्ह्यात "कोरोना'चा प्रभाव 
जिल्ह्यात एकूण एक हजार 232 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, 64 जणांचा मृत्यू झाला आहे. शिरपूर येथील माजी आमदारांचे पुत्र, धुळ्यात आमदारांचा भाऊ, भाजप पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकाचा मृत्यू झाला आहे. साक्रीचे माजी आमदार व त्यांच्या परिवारातील काही सदस्य बाधित झाले होते. महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याचा मुलगा पॉझिटिव्ह आढळला आहे. 

loading image
go to top