esakal |  ते आले...दांपत्याला घरात बांधले आणि चोरी करून गेले ! 
sakal

बोलून बातमी शोधा

 ते आले...दांपत्याला घरात बांधले आणि चोरी करून गेले ! 

दांपत्याचे हातपाय बांधले आणि घरातून रोकड आणि दागदागिने मिळून लाखाचा ऐवज लंपास केला. पोबारा करताना चोरट्यांनी पिंजारी यांच्या पाळीव श्वानाला विहिरीत फेकले.

 ते आले...दांपत्याला घरात बांधले आणि चोरी करून गेले ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : दांपत्याला बांधून ठेवत, त्यांच्या पाळीव श्‍वानाला विहिरीत फेकून देत चार चोरट्यांनी देवपूरमधील भूजल कॉलनीत हातसफाई केली. सोमवारी (ता. २७) मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. रोकड, दागदागिने लंपास करत चोरट्यांनी पळ काढला. 

देवपूरमध्ये पंचवटी भारत गॅस गुदाम आहे. या परिसरात भूजल कॉलनीत जय मल्हार किराणा दुकानासमोर बाजार समितीत हमाली करणारे मुस्ताक पिंजारी यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या घरात चार चोरट्यांनी हातसफाई केली. त्यांनी पिंजारी दांपत्याचे हातपाय बांधले आणि घरातून रोकड आणि दागदागिने मिळून लाखाचा ऐवज लंपास केला. पोबारा करताना चोरट्यांनी पिंजारी यांच्या पाळीव श्वानाला विहिरीत फेकले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रात्री पोलिस गस्त वाढावी, अशी मागणी परिसरातून झाली. 

चोरट्यांनी चाळीस हजारांच्या किमतीचे चांदीचे कडे, पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, कपाटातील बारा हजार रुपयांची रोकड लंपास केली. गेल्या दीड वर्षांपूर्वी याच ठिकाणी चोरी झाल्याचे पीडित पिंजारी यांनी सांगितले. देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सदिच्छानगरातून दोन तलवारी जप्त 
धुळे शहरातील मिल परिसरातील सदिच्छानगरात तरुणाच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी हस्तगत केल्या. अवैधपणे घातक शस्त्र बाळगणाऱ्या‍ नयन गोविंद पाटीलवर (वय २०) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार विशाल पाटील यांनी फिर्याद दिली. पथकाने पहाटे चारच्या सुमारास ऑपरेशन ऑल आउटअंतर्गत ही कारवाई केली. त्यात संशयिताने ५४ आणि ८० सेंटिमीटर लांबीची तलवार घरातील रँक खाली लपवून ठेवली होती. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे