esakal | धुळे जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांचा महाविरोध !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांचा महाविरोध !

केंद्रीय कृषी धोरण तत्काळ रद्द करावे, अशी मागणी स्वाक्षरी मोहिमेद्वारे राष्ट्रपतींकडे केली. यातून शेतकरी केंद्रीय भूमिकेवर नाराज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

धुळे जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांचा महाविरोध !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  ः केंद्रीय कृषी धोरणाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेसने तीव्र विरोध केला. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तीत जिल्ह्यातील तीन लाख २६ हजार शेतकऱ्यांनी स्वाक्षरीद्वारे महाविरोध दर्शविला. त्याची कागदपत्रे मुंबईत पक्षीय प्रदेश कार्यालयात वरिष्ठ नेत्यांकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सादर केल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली. 

वाचा- जिल्हा रुग्णालयाचा चमत्कार; झिंगलेले अकरा मद्यपींची वैद्यकीय तपासणी ‘निल’! 
 


काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात प्रदेश समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय तीन कृषी विधेयकांना विरोधासाठी शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार धुळे जिल्ह्यात तीन लाख २६ हजार शेतकऱ्यांनी कृषी धोरणाला विरोध केला. तसेच केंद्रीय कृषी धोरण तत्काळ रद्द करावे, अशी मागणी स्वाक्षरी मोहिमेद्वारे राष्ट्रपतींकडे केली. यातून शेतकरी केंद्रीय भूमिकेवर नाराज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

जिल्ह्यात आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांच्या मार्गदर्शनानुसार चारही तालुके, धुळे शहरात शहराध्यक्ष युवराज करनकाळ यांच्या प्रयत्नांनी स्वाक्षरी मोहीम राबविली. सर्व स्वाक्षरीचे अर्ज मुंबईत प्रदेश कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस तथा राज्य प्रभारी एस. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महासमितीचे सचिव संदीप दुवा, संपत कुमार, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांच्या उपस्थितीत प्रदेश युवक काँग्रेसचे येथील सरचिटणीस राहुल माणिक, युवक काँग्रेसचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र झालसे, कल्लू पठाण यांनी बैठकीवेळी सादर केले. मोहिमेसाठी शिंदखेडा तालुक्यात आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. 

संपादन- भूषण श्रीखंडे