"टिक टॉक'वरची भाईगिरी...सिनेस्टाइल व्हिलनसारखा डायलॉग तिघांना महागात! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

टिक टॉकवर बुधवारी (ता. 8) व्हिडिओ अपलोड केला. ही माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाली. त्यांनी "एलसीबी'ला कारवाईची सूचना दिली. त्यानुसार पथकाने भीमनगरच्या प्रवेशद्वाराजवळ दीपककडून गावठी कट्टा व काडतूस जप्त केले.

धुळे : "टिक टॉक'वर सिनेस्टाइल व्हिलनसारखा डायलॉग, हातात पिस्तूल अर्थात गावठी कट्ट्याद्वारे भाईगिरी करणाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांना थेट गजाआड जाण्याची वेळ आली. जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे शहरासह जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष अभियान राबविले जात आहे. त्यात टिक टॉकमुळे संशयित तिघे अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 
शहरातील साक्री रोडवर भीमनगर परिसरात संशयित दीपक सुरेश शिरसाठ याच्याकडे गावठी पिस्तूल असून, त्याने त्याचे प्रदर्शन करत टिक टॉकवर बुधवारी (ता. 8) व्हिडिओ अपलोड केला. ही माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाली. त्यांनी "एलसीबी'ला कारवाईची सूचना दिली. त्यानुसार पथकाने भीमनगरच्या प्रवेशद्वाराजवळ दीपककडून गावठी कट्टा व काडतूस जप्त केले. याबाबत विचारणा केल्यावर पंकज परशराम जिसेजाने (रा. पद्मनाभनगर, साक्री रोड) कट्टा दिल्याची माहिती दीपकने दिली. त्यानुसार पोलिस पथकाने पंकजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अभय दिलीप अमृतसागर (रा. कुंडाणे, ता. धुळे) याचे नाव पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी या तीन संशयित तरुणांना अटक केली. तसेच या कारवाईत दोन कट्टे, तीन काडतुसे जप्त केली. पोलिस अधीक्षक पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार श्रीकांत पाटील, संजय पाटील, पोलिस नाईक प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे, गुलाब पाटील यांनी ही कारवाई केली. 

पस्तीस हजारांचा गावठी कट्टा 
एलसीबीच्या पथकाने सापळा रचत दीपकला पकडले. त्याच्या अंगझडतीत 35 हजार 500 रुपये किमतीचा गावठी कट्टा व काडतूस आढळले. अभयकडील गावठी कट्ट्याची किंमत 36 हजार रुपये आहे. पंकजविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात, तसेच धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून, अभयविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात पूर्वी गुन्हा दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule tiktok video dabanggiri police arrest tree porson