coronavirus ट्रॅव्हल्समधील साडेतीनशेवर प्रवाशांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सद्वारे बाहेर गावावरून धुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेच्या पथकाने आजपासून तपासणी सुरू केली. पथकाने मालेगाव रोड अवधान टोल नाक्‍यावर सकाळी पहाटे साडेचार ते सातदरम्यान सर्व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची "नॉन कॉन्टॅक्‍ट इन्फ्रारेड थर्मामीटर' मशिनद्वारे तपासणी केली.

धुळे : कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पथकाने आज बाहेर गावावरून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची तपासणी सुरू केली. मोहिमेच्या आज पहिल्या दिवशी एकूण 360 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने यातील कुणीही संशयित रुग्ण आढळला नाही. 

हेपण पहा - महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सद्वारे बाहेर गावावरून धुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेच्या पथकाने आजपासून तपासणी सुरू केली. पथकाने मालेगाव रोड अवधान टोल नाक्‍यावर सकाळी पहाटे साडेचार ते सातदरम्यान सर्व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची "नॉन कॉन्टॅक्‍ट इन्फ्रारेड थर्मामीटर' मशिनद्वारे तपासणी केली. एकूण साधारण दहा ते बारा ट्रॅव्हल्समधील एकूण 360 प्रवासी व वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यात कोणताही प्रवासी संशयित रुग्ण आढळून आला नाही. ही मोहीम पुढील आदेश होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे. 

पाचजण "होम क्‍वारंटाईन' 
दरम्यान महापालिका व जिल्हा प्रशासनाने आज परदेशातून आलेल्या चार व मुंबईहून आलेला एक अशा पाच नागरिकांचीही तपासणी केली. यात जर्मनीवरुन दोन तर सौदी अरेबिया, यूएस व मुंबईवरून प्रत्येकी एकाजणाचा समावेश आहे. या पाचही नागरिकांना "होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. तशा नोटिसा संबंधित नागरिकांना बजावण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तींच्या डाव्या हाताच्या वर व हाताच्या पाठीमागे "होम क्वारंटाईन'चा शिक्का मारला आहे. पाचही जणांना 14 ते 15 दिवस घराबाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनीही दक्षता घ्यायची असून अशी व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर शासन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांना अशी व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये याबाबत माहिती द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule travels passenger cheacking corona virus