शिरपूर ः शेतातून सव्वादोन कोटींचा गांजा जप्त 

सचिन पाटील
Wednesday, 17 June 2020

गांजा तस्करीत आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून, दुर्गम भागातील मार्गांवरून गांजाची वाहतूक होत असल्याचा अंदाज आहे. गांजा आढळलेली शेती वन विभागाच्या अखत्यारीत असल्याचे कळते. जप्त गांजाची तब्बल 18 तास मोजणी सुरू होती.

शिरपूर ः लाकड्या हनुमान (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील शेतात दडवून ठेवलेला 39 किलो गांजा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात "एलसीबी'चे पथक व सांगवी पोलिसांनी जप्त केला. संशयित मात्र फरार झाला. या मुद्देमालाची किंमत सव्वादोन कोटी रुपये आहे. 
लाकड्या हनुमान शिवारातील मांगीलाल बारकू पावराने शेतात गांजा दडवून ठेवल्याची माहिती "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पथक तयार केले. सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी लाकड्या हनुमान गावापासून 15 किलोमीटरवरील शेतात छापा टाकला. तेथे एकूण 70 पत्र्याच्या कोठ्यांमध्ये गांजा दडवल्याचे आढळले. हा साठा सांगवी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर मोजला असता तो 39 किलो भरला. गांजाची किंमत दोन कोटी 14 लाख 72 हजार रुपये आहे. एक दुचाकी, तराजू, वजन, असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. एकूण दोन कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. छाप्याची कुणकूण लागताच संशयित मांगीलाल पावरा फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 
 
संशयित आंतरराज्यीय तस्कर 
लाकड्या हनुमान परिसरात यापूर्वीही वेळोवेळी कारवाई करून पोलिसांनी गांजाची शेती, सुका गांजा पकडला. संशयित मांगीलाल पावरा गांजाच्या तस्करीत सक्रिय असून, त्याचे धागेदोरे मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत असल्याचा संशय आहे. गांजा तस्करीत आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून, दुर्गम भागातील मार्गांवरून गांजाची वाहतूक होत असल्याचा अंदाज आहे. गांजा आढळलेली शेती वन विभागाच्या अखत्यारीत असल्याचे कळते. जप्त गांजाची तब्बल 18 तास मोजणी सुरू होती. प्लास्टिकच्या 128 गोण्यांमध्ये हा माल भरण्यात आला. विजांचा कडकडाट, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांनी 18 तास अखंड राबून मोजणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule two crores ganja recover