esakal | दोन वर्षाची चिमुकली रात्री झाली बेपत्‍ता; सकाळी तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना
sakal

बोलून बातमी शोधा

two year girl missing

कुटुंबीय झोपले असताना रात्री साडेअकराला अचानक महाजन यांना जाग आली. तेव्हा जवळच झोपलेली प्राची आढळून आली नाही.

दोन वर्षाची चिमुकली रात्री झाली बेपत्‍ता; सकाळी तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : निमगुळ (ता. धुळे) येथील दोन वर्षांची बालिका शनिवारी (ता. १७) रात्री आई- वडील झोपले असताना बेपत्ता झाली होती. आज तिचा मृतदेह एका विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. देशभरात मुलींच्या अपहरणाच्या व लैंगिक छळाच्या घटना होत असल्याने गुन्हेगाराला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. 
निमगुळ येथील शेतकरी प्रविण रामराव महाजन हे पत्नी पूजा व एक मुलगा ऋषी (वय ५) व मुलगी प्राची (वय २ वर्षे) हिच्यासह निमगुळच्या नवेगाव भागात राहतात. त्यांचे घर हे गावाच्या शेवटच्या टोकाला नवीन वस्तीत असून पुढे शेती आहे. त्यांच्याच घरात मध्यभागी कमान बांधून दुसऱ्या बाजूला त्यांची आई व लहान भाऊ अनिल रामराव महाजन पत्नी मोनालीसह राहतात. 

हवा येण्यासाठी दरवाजा होता उघडा
सध्या ऑक्टोबर हिटमुळे हवा येण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा बंद न करता उघड्या दरवाजावर आतून खाट लावतात. रात्री याच पध्दतीने प्रवीण महाजन यांचे कुटुंबीय झोपले असताना रात्री साडेअकराला अचानक महाजन यांना जाग आली. तेव्हा जवळच झोपलेली प्राची आढळून आली नाही. त्यांनी घरात शोधाशोध केली. भाऊ व आईला प्राची तिकडे आली का विचारले. प्रवीण महाजन, अनिल महाजन व त्यांच्या ओळखीचे रवींद्र माळी यांनी सर्वत्र तपास केला. व्हॉटस्‌अॅपवर मॅसेज व्हायरल केला. मात्र उपयोग झाला नाही. 

मृतदेह तरंगताना दिसताच आक्रोश
सकाळ उठल्‍यानंतर देखील प्राचीची शोधाशोध सुरू झाली. याच दरम्‍यान सकाळी नऊच्या सुमारास वेल्हाणे येथील एकाचा निमगुळ शिवारातील शेतात विहीरीतून पाणी घेण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी पावरा कुटुंबाला प्राचीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्‍याने ही बातमी लागलीच कळविल्‍यानंतर कुटूंब घटनास्‍थळी आले. तिला बाहेर काढल्‍यानंतर आई- वडीलांनी एकच आक्रोश केला. तिला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे तपास करीत असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे