चिकनपेक्षा भाजीपाला खाणे परवडेना

एल. बी. चौधरी
Thursday, 1 October 2020

कोरोना व्हायरसमुळे चिकन, मटन, अंडे, मासे खाण्यावर अनेकांचा भर आहे. अर्थात मटनचा भाव सोडला तर रोजच्या भाजीपाल्याच्या तुलनेत चिकन, मासे आणि अंडे खाणे परवडणारे आहे.

सोनगीर (धुळे) : बाजारात भाजीपाला आवकमध्ये मोठी घट झाल्याने दर कडाडले असून काही बहुतांश भाजीपाला ८० ते १०० रूपये किलो झाले आहेत. तर कोथिंबीर २०० रुपये किलो झाली असून बॉयलर चिकन १४० रुपये किलो व मासे दोनशे रुपये किलो मिळत असल्याने भाजीपालापेक्षा चिकन, मासे खाणे परवडू लागले आहे. यंदाच्या अधिक पावसामुळे भाजीपाला सडून फेकावा लागला. विशेष म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये भाव गडगडतात. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. 

यंदा अधिक पावसाचा फटका खरीप पिकांना बसल्याने उत्पादनात घट झाली. खरीप पिके काढणीनंतर भाजीपाला उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. म्हणून आवक वाढून भाव कमी होतात. यंदा भाजीपाला उत्पादन वाढले; पण खराब मालामुळे बराचसा माल फेकावा लागला. परिणामी येथील बाजारपेठेत गरजेच्या तुलनेत केवळ दहा टक्के आवक होत असून दर भरमसाठ वाढले आहेत. सध्या हिरवी मिरची, काकडी, मेथी, पालक, बटाटे, शिमला मिरची, कांदे, पत्ता कोबी, गिलोडी, दुधी भोपळा, कोथिंबीर, वांगी, कांदा पात, पोकळा, भेंडी, कारले, गिलकी, फ्लावर, दोडकी, वाल शेंगा, अदरक, शेवगा, लसून, कांदा यांची अत्यल्प आवक होत आहे. 

भाजीपाला जातो गुजरातमध्ये
कापूस काढणीनंतर विहीरीतील पाण्यावर भाजीपालाचे उत्पादन घेतले जाईल व त्यानंतर भाव कमी होतील. हा परिसर मेथी, पोकळा, पालक उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. येथून दररोज ट्रकभर भाजीपाला सुरत (गुजरात) येथे पाठविला जातो. मात्र सध्या परिसरातच भाजीपाला टंचाई असल्याने गुजरातेत माल पाठविणे बंद झाले आहे. 

फळे महागली
फळे खाणे हे सर्वसामान्यांसाठी आजही न परवडणारी बाब असल्याचे बाजारातील किंमतीवरून दिसून येते. सध्या बाजारात सफरचंद, पपई, मोसंबी, सीताफळ, केळी, चिकू आदींची आवक वाढली आहे. पपई ४० रुपये किलो, केळी ३० रुपये डझन, सफरचंद ३५० ते ४०० रुपये किलो, मोसंबी व सीताफळ २०० ते २५० रुपये किलो दर आहेत. 

रोज खाणे कसे परवडणार
कोरोना व्हायरसमुळे चिकन, मटन, अंडे, मासे खाण्यावर अनेकांचा भर आहे. अर्थात मटनचा भाव सोडला तर रोजच्या भाजीपाल्याच्या तुलनेत चिकन, मासे आणि अंडे खाणे परवडणारे आहे. कारण भाज्‍यांचे दर प्रचंड वाढल्‍याने नॉनव्हेज खाणे परडतेय. परंतु ते देखील रोज खाणे परवडणारे नाही.

शेतकरींकडे माल असतो तेव्हा बाजारात मंदी होवून भाव घसरतात.माल नसतो तेव्हा दर तेज असतात. शेतकरी नेहमी तोट्यातच असतो. अधिक पाावसामुळे भाजीपाला खराब होऊन फेकावा लागल्याने उत्पादनात घट होवून आवक कमी व दर वाढले आहेत.
- रविंद्र सुका माळी, भाजीपाला व्यापारी, सोनगीर

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule vegetable and chicken fish same rate market