esakal | विधानपरिषद निवडणूक : साक्री तालुक्यातील ३७ मतदार; नेत्‍यांकडून जोरदार प्रयत्‍न 
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan parishad election

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे.

विधानपरिषद निवडणूक : साक्री तालुक्यातील ३७ मतदार; नेत्‍यांकडून जोरदार प्रयत्‍न 

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : विधानपरिषदेच्या धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीत तालुक्यातून ३७ लोकप्रतिनिधी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार असून, यात जिल्हा परिषदेचे १७ सदस्य, पंचायत समितीच्या सभापती, नगरपंचायतचे १७ नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक असे ३७ लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. एक डिसेंबरला तहसील कार्यालयात सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. 

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. यात तालुक्यातील ३७ लोकप्रतिनिधी मतदार देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये भाजपकडे सध्या जिल्हा परिषदेतील सात सदस्य असून, महाविकास आघाडीकडे मात्र जिल्हा परिषदेतील १०, पंचायत समिती सभापती व नगरपंचायतमधील १८ अशा एकूण २९ सदस्यांचे पाठबळ आहे. 

असे आहेत मतदार
जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन, शिवसेनेच्या एक सदस्य तर अन्य दोन्ही अपक्ष सदस्य देखील सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत. यासोबतच पंचायत समितीच्या सभापतींना देखील मतदानाचा अधिकार असून, त्या देखील कॉंग्रेसच्या सदस्या आहेत. तर साक्री नगरपंचायत मधील कॉंग्रेसचे ११, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच व दोन स्वीकृत सदस्य असे एकूण १८ मतदार हे देखील महाविकास आघाडीकडे आहेत. 

जोरदार प्रयत्‍न
दरम्यान हे सध्याचे पक्षीय बलाबल असले तरी सध्या अधिकाधिक सदस्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून व त्यांच्या अन्य नेतेमंडळींकडून जोरदार प्रयत्न होत असल्याने दोन्हीकडे यापैकी प्रत्यक्षात किती मतदान होते हे पाहणे औत्सुक्तेचे ठरणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image