विधान परिषद निवडणूक : दहा केंद्रात आज मतदान 

रमाकांत घोडराज
Tuesday, 1 December 2020

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपापल्या सदस्यांना मतदानाच्या पक्षादेशाबाबत व्हीप बजावला आहे. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडीतील पक्ष वगळता इतर अपक्ष आणि अन्य पक्षीय मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

धुळे : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १) सकाळी आठ ते दुपारी पाचपर्यंत निर्धारित दहा केंद्रात मतदान होणार आहे. त्यात शिरपूरस्थित भाजपचे नेते माजी मंत्री अमरिशभाई पटेल आणि शहादास्थित महाविकास आघाडीचे नेते अभिजित पाटील या उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त होईल. या रंगतदार लढतीचा तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल. 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपापल्या सदस्यांना मतदानाच्या पक्षादेशाबाबत व्हीप बजावला आहे. त्यामुळे भाजप, महाविकास आघाडीतील पक्ष वगळता इतर अपक्ष आणि अन्य पक्षीय मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी ऐन विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघातील रिक्त जागी ही पोटनिवडणूक होत आहे. 

तयारीचा आढावा 
निवडणूक यंत्रणेने साहित्यवाटप करत मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. तिचा आढावा जिल्हाधिकारी संजय यादव, निवडणूक उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी सोमवारी (ता. ३०) घेतला. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील प्रत्येक तहसील कार्यालय मिळून १० मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क, ताप तपासणीसाठी थर्मल गन असेल. प्रत्येक केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असेल. धुळे, नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. रघुनाथ भोये आरोग्य समन्वयक अधिकारी असतील. 
 
५० कर्मचारी सज्ज 
संसर्गजन्य कोरोनासंबंधी नियम, सूचनांचे पालन करत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. उमेदवार, मतदार आणि मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक असेल. प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी असतील. दहा केंद्रावर एकूण ५० कर्मचारी असतील. त्यात मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असेल. प्रत्येक केंद्रात मतदारांची तपासणी होईल. पसंती क्रमांकानुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. 

पक्षनिहाय मतदार 
येथील महापालिकेतील लोकसंग्राम संघटनेच्या हेमा गोटे, शिंदखेडा नगरपंचायतमधील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांचा राजीनामा, निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरलेले धुळे मनपातील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे वगळता विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात एकूण ४३७ मतदार आहेत. त्यात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, एमआयएमचे नऊ, समाजवादी पक्षाचे चार, बसप एक, मनसे एक आणि अपक्ष १० सदस्यांचा समावेश आहे. 
 
सोनिया सेठी तळ ठोकून 
निवडणुकीसाठी उच्चपदस्थ अधिकारी सोनिया सेठी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली. निरीक्षक श्रीमती सेठी गुलमोहोर शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास असून, त्यांचा संपर्क क्रमांक ९५४५९ ७९४२३ हा आहे. या निवडणुकीसंदर्भातील कामकाजासाठी अथवा उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना भेटीसाठी श्रीमती सेठी मंगळवारी (ता. १) दुपारी १२ ते १ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असतील, असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule vidhan parishad election today voting