पोरक्या जुळ्यांचा आत्यासह गोताणेकरांकडून सांभाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोरक्या जुळ्यांचा आत्यासह गोताणेकरांकडून सांभाळ

पोरक्या जुळ्यांचा आत्यासह गोताणेकरांकडून सांभाळ
धुळे : गोताणे (ता. धुळे) येथील पाचवर्षीय जुळ्या मुलांचे वडील (Father) कोरोनाशी मुकाबला (corona fight) करताना मृत्युमुखी (Death) पडले. तर आई तीन वर्षांपूर्वीच पोटच्या गोळ्यांना कायदेशीररीत्या वडीलांकडे सोपवून निघून गेली. त्यामुळे पोरक्या झालेल्या जुळ्या मुलांचा आत्यासह गोताणे गावाने सांभाळ केला. अशा मुलांना शासकीय योजनेचा (Government scheme) लाभ मिळावा म्हणून गोताण्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी धडपड सुरू केली. त्यांना सहकार्यासह बालकल्याण समितीनेही जुळ्या मुलांना मायेची ऊब दिली. त्यामुळे गोताणेकर सुखावले आहेत. (village came forward to take care of the orphans)

जुळ्या मुलांचा सांभाळ करणारी आत्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी माणुसकीची जाण ठेवत आई-वडिलांविना पोरक्या झालेल्या जुळ्या मुलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्या मुलांसह ते धुळे शहरातील साक्री रोडवरील बालगृहातील बालकल्याण समितीपुढे हजर झाले. त्यांची धडपड पाहून बालकल्याण समितीही गहिवरली. समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, सदस्य प्रा. वैशाली पाटील, डॉ. सुदाम राठोड, ॲड. मंगला चौधरी, मीना भोसले यांनी श्री. पाटील यांचा सत्कार केला.

दर सोमवारी आढावा बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात कोरोनाच्या संकटकाळात एक किंवा दोन पालक गमावलेल्या शून्य ते १८ वयोगटांतील मुला-मुलींना शासकीय आर्थिक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बालकल्याण समितीने जिल्हास्तर, तालुकास्तर आणि प्रत्येक गावागावांत जनजागृती सुरू केली आहे. याद्वारे पीडित मुला-मुलींपर्यंत योजनेचा लाभ पोचावा, असा समितीचा उद्देश आहे. महिला व बाल विकास अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर समिती स्थापना केली आहे. यात विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डोंगरे यांनी कायदेशीर मदतीसाठी वकील उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी संजय यादव योजनेबाबत कार्यवाहीचा दर सोमवारी आढावा घेत आहेत.


टास्क फोर्स समिती सदस्य
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना झाली आहे. यात बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. दुसाने यांच्याकडे धुळे शहर (मो. ८२७५० ०७३९०), सदस्य प्रा. वैशाली पाटील यांच्याकडे शिंदखेडा तालुका (मो. ७५८८७ ३६०४६), प्रा. सुदाम राठोड यांच्याकडे साक्री तालुका (मो. ९१७५० २२२१६), मीना भोसले यांच्याकडे धुळे तालुका (मो. ९६५७८ २५९६३), ॲड. मंगला चौधरी यांच्याकडे शिरपूर तालुक्याची (मो. ९३७२७ १०७८१) जबाबदारी आहे. या अनुषंगाने धुळे शहरासह जिल्ह्यात पीडित मुला-मुलींना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून नोंदणीचे कामकाज सुरू आहे. बांधिलकी जोपासत प्रत्येक दक्ष व्यक्तीने पीडित मुला-मुलींपर्यंत त्यांचा सांभाळ करणाऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवून बालकल्याण समिती सदस्यांशी संपर्क साधण्याची सूचना द्यावी, अशी अपेक्षा आहे.


दलालांपासून सावध राहा
पीडित मुला-मुलींना शासकीय योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे कुणीही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. दलालांशी आर्थिक व्यवहार करू नये. पीडित मुला-मुलींनी किंवा त्यांचा सांभाळ करणाऱ्यांनी थेट बालकल्याण समिती सदस्य, प्रसंगी जिल्हाधिकारी, तालुक्यातील तहसीलदार, महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन आहे.

टॅग्स :Fight With Coronavirus