सोनगीर मधील वादाला धार्मिक स्वरुप

एल. बी. चौधरी
बुधवार, 14 मार्च 2018

भाजीपाल्याची लोटगाडी लावण्यावरुन दोघात झालेल्या वादाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले असले तरी निरपराधांना शिक्षा होऊ नये यासाठी सोनगीर ग्रामस्थांकडून पोलिसांना विनंती करण्यात येत आहे.

सोनगीर (जि. धुळे) - येथील बसस्थानकावर भाजीपाल्याची लोटगाडी लावण्यावरुन दोघात झालेल्या वादाला धार्मिक स्वरूप देण्यात आले असले तरी दोन - चार विद्वेष पसरविणाऱ्या असामाजिक तत्वांमुळे हिंदू व मुस्लीम बांधवांतील एकता भंग पावेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. येथील लोकांनी आम्ही अद्यापही एकच आहोत हे दोन्ही धर्मियांनी दाखवून दिले आहे. दोन्ही धर्मियांची एकमेकांविरुद्ध कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात नाही.

घटनेच्या दुसर्‍या दिवसापासूनच नेहमीप्रमाणे एकमेकांतील व्यवहार सुरू आहेत. मात्र पोलिसांकडून अजूनही धरपकड सुरू असून निरपराधांवर कारवाई होवू नये अशी वारंवार मागणी येथील गावकऱ्यांकडून केली जात आहे. पोलिस पकडतील या भितीने अनेक दोषी व निर्दोषही गाव सोडून पळून गेले आहेत. या घटनेत पोलिसांनी लावलेली काही कलमे (उदा; 307) संशयित युवकांचे आयुष्य उध्वस्त करणारे आहे. पकडलेल्या व एफआयआर मध्ये नोंद असलेल्या काही संशयित निरपराध असल्याचे सांगितले जात आहे. अशा निरपराधांना वगळा व यापुढेही निरपराधांवर कारवाईचा बडगा उगारला जावू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. घटनेच्या दिवशीच रात्री पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लीम समाजातील प्रमुखांची एकत्रित शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्याचवेळी दोन्ही धर्मातील प्रमुखांनी खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी पण निरपराधांना विनाकारण त्रास देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले व एफआयआर मधून निरपराधांची नावे वगळण्यात यावी, अशी मागणी येथील संशयितांच्या महिला नातेवाईकांकडून करण्यात आली. मात्र अद्याप एकालाही दिलासा मिळालेला नाही. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एकही निरपराध असल्याचे वाटत नाही. संशयितांबाबत ठोस पुरावे असल्याचे ते सांगतात. खरोखर निरपराध असलेल्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र ग्रामस्थांना पोलिसांची भुमिका तरुणांविरोधी वाटते.

पुर्वी कुठल्यातरी हिंदूत्ववादी संघटनेच्या उपक्रमात भाग घेतलेल्यांनाच त्रास दिला जात असल्याचे काहींना वाटते. मग यापुढे हिंदूत्ववादी संघटनेच्या उपक्रमात सहभागी व्हायचे की नाही? हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान दोन आठवडे झाले तरी पकडलेले आठ - दहा संशयित अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाही. पकडलेले काही नोकरदार व विद्यार्थी असून जर त्यापैकी एकही निरपराध असेल तर मात्र त्याचे आयुष्य उध्वस्त होणार आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्न कायम आहे. सोनगीर गावात आठशे वर्षापासून हिंदू मुस्लीम एकत्र व गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सण उत्सवात तसेच सुखदुःखात सहभागी होतात. यापुढेही एकतेची ही भिंत अशीच अभेद्य राहील याची ग्वाही दोन्ही समुदायाने शांतता समितीच्या बैठकीत तसेच दुसर्‍या दिवसापासून सुरू झालेल्या व्यवहारावरुन दाखवून दिले आहे. 

Web Title: marathi news dhule village fight hindu muslim police