गावात एकच बॅंक; तीही रामभरोसे! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

घरापासून माझ्या शेती उत्तरेकडे पाच किलोमीटरवर, तर बॅंक शाखा पश्‍चिमेला साडेतीन किलोमीटरवर आहे. बॅंकेतील कर्मचाऱ्यांचे बाहेरगावचे दौरे, बंद असलेले पासबुक प्रिंटर, परिसरातील एकच बॅंक असल्याने प्रमाणाबाहेर होणारी गर्दी यामुळे लवकर काम होत नाही. एकाच कामासाठी अनेक दिवस चकरा माराव्या लागतात. वाहन नसल्याने शेतीकाम होत नाही अन्‌ बॅंकेतही पूर्ण काम होत नाही. त्यामुळे पूर्ण दिवस वाया जातो. 
- दाजभाऊ वाघ, ग्राहक, निकुंभे, ता. धुळे 

धुळे : गावात राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकच शाखा आहे. या शाखेत गावासह परिसरातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांची खाती आहेत. मात्र, बॅंकेचे साहेब नेहमीच दौऱ्यावर असतात, तर कर्मचारीही गायब होतात. बॅंकेतील पासबुक भरण्याचे प्रिंटरही नेहमीच बंद असते. यामुळे हजारो ग्राहक मेटाकुटीला आले असून, बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत शेतकऱ्यांसह ग्राहकांना त्वरित सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी बोरीस (ता. धुळे) व परिसरातील ग्राहकांकडून होत आहे. 
बोरीस येथे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची एकमेव राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेत बोरीससह परिसरातील रामी, बोरसुले, वडणे, बुरझड, निकुंभे, कोठरे, चिमठावळ आदी गावांतील शेतकरी, नोकरदार, तसेच सर्वसामान्य ग्राहकांची बचत खाती आहेत. तसेच परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी आपल्या विद्यार्थ्यांची खातीही याच बॅंकेत उघडली आहेत. अनेकांची जनधन खातीही आहेत. आर्थिकदृष्ट्या मोठी उलाढाल बॅंकेत होत असल्याने दिवसभर बॅंकेत ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, बॅंकेचे कार्यालय लहान असल्याने काही ग्राहकांना बाहेरच थांबावे लागते. यातही शाखेतील पासबुक भरण्याचे प्रिंटर नेहमीच बंद असते. शाखेत कर्मचारी दिवसभर राहत नाहीत. साहेब दौऱ्यावर असल्याची उत्तरे मिळतात. यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. 

ग्राहकांचा पूर्ण दिवस वाया 
परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी बोरीसला यावे लागते. मात्र, आवश्‍यक सोयी- सुविधांच्या अभावामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत राहावे लागते. सकाळी दहाला रांगेत उभे राहिल्यानंतर एका ग्राहकाला तब्बल दोन ते चार तास बॅंकेत घालवावे लागतात. घरातून बाहेर पडल्यानंतर परत जाईपर्यंत शेतकऱ्यांचे किमान सहा तास वाया जातात. त्यामुळे त्या दिवसाचे शेताचे काम रद्द करावे लागते. रामी, निकुंभे व कोठरे गावातून नियमित वाहने उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच ग्राहकांना पायी यावे लागते. अशा शेतकऱ्यांचे बॅंकेत काम होत नाहीच, शिवाय पूर्ण दिवस वाया जातो. 

नव्या बॅंकेसह एटीएम व्हावे 
बोरीस परिसरातील राष्ट्रीयीकृत बॅंकेत नागरिकांची गैरसोय होत असल्याने अन्य एखाद्या राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बॅंकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. परिसरात बोरीस, लामकानी, बुरझड, नंदाणे ही मुख्य रस्त्यावरील मोठी गावे आहेत. यापैकी एखाद्या गावात मोठ्या बॅंकेने शाखा सुरू केल्यास परिसरातील नागरिकांची सोय होईल. परिसरातील गावांमध्ये एटीएम उपलब्ध नसल्याने नागरिकांना बॅंकेतच यावे लागते. रात्री-अपरात्री पैशांची अडचण आल्यास खात्यात पैसे असूनही त्यांचा वापर करता येत नाही. रस्त्यावर पेट्रोल संपले किंवा अपघात झाल्यास दूरपर्यंत "एटीएम' उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही गावात जाऊन पैशांची मागणी करावी लागते. परिणामी बॅंकेची शाखा व "एटीएम'ची मागणी जोर धरत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule village singal bank