esakal | सुटीत फिरण्याचे निमित्‍त पडले महागात; दरीत कोसळून महिलेचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

dies lading hills and death

सुटी असल्‍याने संपुर्ण परिवार जवळच असलेल्‍या किल्‍ल्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. पहाटेची वेळ असल्‍याने सारे शांत होते. किल्‍ल्‍यावरील प्रत्‍येक क्षणाचा आनंद परिवारातील सदस्‍य घेत होते. फोटो देखील काढत होते. परंतु, या आनंदी परिवारावर अचानक आक्रोश करण्याची वेळ आली.

सुटीत फिरण्याचे निमित्‍त पडले महागात; दरीत कोसळून महिलेचा मृत्‍यू

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : सुटीनिमित्त शहराजवळील ऐतिहासिक लळिंग किल्ल्यावर सफरीला गेलेल्या तरुण विवाहितेचा हृदयद्रावक मृत्यू झाला. पाय घसरून ती किल्ल्यावरून दरीत कोसळली. यात महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची ती पत्नी असल्याने यंत्रणेत शोक प्रकट झाला. 
साक्री रोड परिसरातील गोपाळनगरात चेतन जगन्नाथ चव्हाण यांचे वास्तव्य आहे. त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार, सुटीमुळे मोठा भाऊ प्रफुल्ल जगन्नाथ चव्हाण, त्यांची पत्नी ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय ३७) आणि त्यांचा मुलगा यश शहरापासून दहा किलोमीटरवरील लळिंग किल्ल्यावर फिरायला गेले. 

अन्‌ डोळ्यादेखत दरीत
सकाळी साडेसातच्या सुमारास ललिता चव्हाण पाय घसरून किल्ल्यावरून दरीत पडल्या. झाडाझुडपांमध्ये अडकत ललिता वेगाने खालच्या दिशेने फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या. ही माहिती पती प्रफुल्ल यांनी त्यांचा भाऊ चेतन यांना दिली. त्यामुळे चेतन व त्यांचे मित्र सकाळी नऊच्या सुमारास लळिंग किल्ल्यावर मदतीसाठी पोचले. नंतर ललिता यांचे शोधकार्य सुरू झाले. त्या दरीतील झाडाझुडपांमध्ये जखमी अवस्थेत दिसल्या. लळिंग टोलनाक्याची रुग्णवाहिका व ग्रामस्थांच्या मदतीने ललिता चव्हाण यांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. अरुणकुमार नागे यांनी दुपारी बाराच्या सुमारास ललिता चव्हाण यांना मृत घोषित केले. सेल्फीमुळे ललिता चव्हाण यांचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

संपादन ः राजेश सोनवणे