esakal | मालेगावच्या कृषिमंत्र्यांचा धुळ्यातील पदांवर डोळा! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule medical collage

मालेगाव (जि. नाशिक) येथे कार्यान्वित झालेल्या स्त्री व बालरुग्णालयासाठी धुळ्यातील भरती झालेल्या पदांवर कृषिमंत्री दादा भुसे यांचा डोळा असल्याचे मानले जाते. 

मालेगावच्या कृषिमंत्र्यांचा धुळ्यातील पदांवर डोळा! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : शहरातील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी (सिव्हिल) स्वतंत्र शंभर खाटांचे स्त्री व बालरुग्णालय पूर्वीच मंजूर झाले. ते कार्यान्वित होण्यापूर्वीच राजकीय अहमहमिकेतून काही वैद्यकीय पदांची भरतीही झाली. आता त्यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याचे मानून त्यांची इतरत्र बदली करावी का, असा प्रश्‍न खुद्द सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी उपस्थित करून जिल्ह्याला चिंतेत टाकले. यामागे मालेगाव (जि. नाशिक) येथे कार्यान्वित झालेल्या स्त्री व बालरुग्णालयासाठी धुळ्यातील भरती झालेल्या पदांवर कृषिमंत्री दादा भुसे यांचा डोळा असल्याचे मानले जाते. 

४७ पैकी २५ पदांची भरती 
विशेष म्हणजे विद्यमान कृषिमंत्री भुसे गेल्या भाजप-शिवसेनाप्रणीत सरकारच्या कालावधीत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्या वेळी स्त्री व बालरुग्णालयासाठी विविध प्रक्रिया पार पाडल्या. त्यात सरासरी १४ डॉक्टर आणि ३३ परिचारिकांची पदे मंजूर झाली. शिवाय आठ डॉक्टर आणि १५ ते २० परिचारिकांची भरती झाली. स्त्री रुग्णालयासाठी इमारत दुरुस्ती, सोयी-सुविधांसाठी तीन कोटी ६३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. तो निधी अद्याप प्राप्त नसल्याने रुग्णालय कार्यान्वित झालेले नाही. याआधी मालेगाव येथे स्त्री व बालरुग्णालय कार्यान्वित करण्यास मंत्री भुसे यांनी यश मिळविले. तेथे डॉक्टर, परिचारिकांची गरज भासत असल्याने धुळ्यातील भरती झालेल्या पदांवरील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. 

पोटात गोळा का उठला? 
याचे कारण शनिवारी (ता. ३१) नंदुरबार दौऱ्यावर आलेले प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयास दुपारी अनपेक्षित भेट दिली. त्या वेळी त्यांनी येथे स्त्री व बालरुग्णालय सुरू न होण्यामागची कारणे जाणून घेतली. तसेच भरतीतील डॉक्टर, परिचारिकांना पुरेसे काम नसेल, तर त्यांना इतरत्र सामावून घ्यावे लागेल, असे सूतोवाच सचिव डॉ. व्यास यांनी केले. त्यामागे मंत्री भुसे यांची मालेगाव येथील रुग्णालयात धुळ्यातील डॉक्टर, परिचारिकांची मागणी असल्याचे मानले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात भरतीतील संबंधित डॉक्टर, परिचारिकांनी अहोरात्र कष्ट उपसले. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे संबंधित डॉक्टर, परिचारिकांची येथे गरज असल्याचा युक्तिवाद झाला आहे. यात सचिव डॉ. व्यास यांच्या भूमिकेमुळे येथील संबंधित कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. पूर्वी पदांची भरती झाली नसती, तर आज आमचे ‘सँडविच’ झाले नसते, असे मत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगीत चर्चेवेळी मांडले. 

लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची 
धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी अनेकांच्या पाठपुराव्यातून स्वतंत्र स्त्री व बालरुग्णालय, त्यासाठी पदे मंजूर झाली. काही पदांची भरती झाली. ती पदे मालेगाव येथे वर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन खासदार डॉ. सुभाष भामरे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मतभेद विसरून स्त्री व बालरुग्णालय येथे लवकर कार्यान्वित होण्यासाठी निर्णायक पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होते. 

संपादन ः राजेश सोनवणे