esakal | कोरोना रोखणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

कोरोनाच्या रुग्णस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्के असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यापुढील काळात कोरोनाचा साथसंसर्ग रोखण्यासाठी जनजागृती आणि कायद्याचा कठोरतेने वापर अशा दोन धोरणांचा अवलंब केला जाईल

कोरोना रोखणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : कोरोना संसर्गामुळे उच्चांकी रुग्ण आढळत असतानाही तालुक्यातील तब्बल ७० ग्रामपंचायतींनी अद्यापही कोरोना वेशीवरच रोखून धरला आहे. सरपंचापासून आशा कार्यकर्तीपर्यंत सर्वांच्या परिश्रमांनी ही कामगिरी साध्य झाली असून तिच्यात सातत्य राखावे. दीर्घकाळ कोरोना रोखणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाईल असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले. 

येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर सीबीएसई स्कूलमध्ये शुक्रवारी (ता. २८) सकाळी कोरोना जनजागृती अभियानाचे उद्घाटन श्री. रंधे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार काशीराम पावरा, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंह पावरा, गटविकास अधिकारी युवराज शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, सुवर्णा पवार, गटशिक्षणाधिकारी एस. सी. पवार, डॉक्टर्स क्लबचे डॉ. मनोज परदेशी, डॉ. योगेश जाधव, सरपंच संघटनेचे हेमंत सनेर आदी उपस्थित होते. 
डॉ. बांदल यांनी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्के असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यापुढील काळात कोरोनाचा साथसंसर्ग रोखण्यासाठी जनजागृती आणि कायद्याचा कठोरतेने वापर अशा दोन धोरणांचा अवलंब केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार आबा महाजन म्हणाले की, कोरोनावर उपचार घेऊन घरी गेल्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहणे सक्तीचे आहे. होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही बाहेर पडणाऱ्यांची माहिती द्या, संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. युवराज शिंदे, डॉ. कुलकर्णी, डॉ. परदेशी, हेमंत सनेर यांनीही मनोगत व्यक्त केले. तुषार रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 
 

loading image
go to top