esakal | यानंतरच सुरू होणार जिल्हा परिषद शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

zilha parishad school

कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवावे. दिवाळीनंतर लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. 

यानंतरच सुरू होणार जिल्हा परिषद शाळा

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर (धुळे) : जिल्हा परिषद शाळा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे प्रशासनाच्या तोंडी आदेशामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना दिले. 
या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी पवार म्हणाले, की शासनाच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसारच शाळा सुरू करण्यात येतील. १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात शाळा सुरू होणार नाहीत. 
शाळेच्‍या पूर्वतयारीचा भाग आहे. शाळा सुरू करण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत सध्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून कुठलीही सूचना प्राप्त नाही. कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवावे. दिवाळीनंतर लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. 

तोंडी आदेश
जिल्हा परिषद प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी घेऊन शाळा सुरू कराव्यात. शाळा व्यवस्थापन समितीचे लेखी ठराव घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तालुकास्तरावर शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांना तोंडी आदेश दिले आहेत. शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांना मुख्याध्यापकांची सभा घेण्यास सांगितले आहे. सभेत शालेय व्यवस्थापन समितीच्या सूचना घ्याव्यात, असे सूचविले आहे. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाचे महाविद्यालय, माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश नाहीत. गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करताना प्राधान्याने इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील, असे सांगितले. 

शिक्षक मात्र संभ्रमात
राज्य शासनाच्या सूचना असताना जिल्‍हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक या परिस्थितीतही शाळा सुरू करण्यासाठी तयार आहेत. मात्र, लेखी आदेश नसल्याने जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमात आहेत. प्रशासनाने याबाबत लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी समन्वय समितीने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे, सदस्य नवीनचंद्र भदाणे, शरद पाटील, चंद्रकांत सत्तेसा, उमराव बोरसे, सुरेंद्र पिंपळे, भूपेश वाघ, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर बोरसे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे