esakal | विद्यार्थ्यांची नव्हे आता शाळांची शंभर गुणांची परीक्षा; अधिकारी बनतील शिक्षक 
sakal

बोलून बातमी शोधा

school

एक दिवस शाळेसाठी या महत्वाकांक्षी उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागातील, जिल्हा परीषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालयातील विविध विभागातील वर्ग एक व दोनचे अधिकारी जि.प. शाळांना महिन्यातून एक दिवस आनंददायी भेटी देतील.

विद्यार्थ्यांची नव्हे आता शाळांची शंभर गुणांची परीक्षा; अधिकारी बनतील शिक्षक 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : जिल्हा परीषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे, शाळांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्यांचे वर्गीकरण करणे, विद्यार्थ्यांना विविध शासकीय अधिकारांचे मार्गदर्शन आणि शाळांच्या अडचणी सोडविण्याकरीता योगदान वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना 'एक दिवस शाळेसाठी' द्यावा लागणार आहे. ते जिल्हा परीषद शाळांची गुणवत्तेचीही चाचपणी करतील. वर्षभरात शंभर गुणांचे मुल्यमापन करून शाळांचा दर्जा ठरविणार आहेत. या नव्या आदेशाने गुरुजींवरील कामाचा पुन्हा बोजा वाढून दबाव वाढणार आहे.

वर्ग एक व दोन अधिकारी देतील भेटी
एक दिवस शाळेसाठी या महत्वाकांक्षी उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागातील, जिल्हा परीषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालयातील विविध विभागातील वर्ग एक व दोनचे अधिकारी जि.प. शाळांना महिन्यातून एक दिवस आनंददायी भेटी देतील. अध्यापनही करतील. शासकिय कामकाजाचेही धडे देतील. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करतील. शाळेत प्रवेशासाठी पालकांचा कल कसा वाढेल यासाठी प्रयत्न करतील. आवश्यक उपाययोजनाही सुचवाव्या लागणार आहेत.

अधिकारी बघतील अन कळवतीलही..!
शाळांची विविध अंगानी तपासणी करुन आढावाही घेतील. धोकादायक बांधकामे, वापरा अभावी अथवा पाण्या अभावी बंद असलेले शौचालये, स्वच्छतागृहे आदी मुलभूत सुविधांचा आढावा घेतील. त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला कळवतीलही. तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

शाळेच्या सर्वांगीण गुणवत्तेला शंभर गुण
स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, हँडवॉश स्टेशन, सुविधांयुक्त क्रीडांगण, वीज व्यवस्था, प्रथमोचार पेटी, संगणक व इंटरनेट व्यवस्था, ग्रंथालय, गणित पेटी, शालेय पोषण आहाराचे रेकॉर्ड, स्वयंपाकाचा दर्जा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य, शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका, शिक्षक व विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरी आदी तपासले जाणार आहे. त्यावर अधिकारी गुणदान करतील.

शंभर गुणांची अशी विभागणी
तपासणीतील बाबी गुण
भौतिक सुविधा - २०
विद्यार्थ्यांसाठी इतर सुविधा - २०
शालेय पोषण आहार - २०
विद्यार्थ्यांची शालेय प्रगती - २०
व्यवस्थापन समिती बैठका - ०५
सीएसआर पटसंख्या बायोमेट्रीक - १५
एकुण गुण - १००

संपादन ः राजेश सोनवणे