या "डिस्को' ज्वारीचे करायचे तरी काय? 

सुधाकर पाटील
Saturday, 9 November 2019

भडगाव ः परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीनचे 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात ज्वारी संपूर्णपणे "डिस्को' झाली आहे. त्यामुळे या "डिस्को' ज्वारीचे करायचे तरी काय? असा प्रश्‍न ग्रासलेल्या बळिराजाकडून उपस्थित होत आहे. जे थोडेफार धान्य येणार आहे त्याला दर्जाच नसल्याने व्यापारी मातीमोल भावात घेत आहेत. दुसरीकडे शासनाच्या हमीभाव केंद्रातही या धान्याला थारा नाही. या पार्श्‍वभूमीवर शासनाने केंद्राच्या माध्यमातून हे सर्व धान्य हमीभावाने खरेदी करावे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

भडगाव ः परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीनचे 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात ज्वारी संपूर्णपणे "डिस्को' झाली आहे. त्यामुळे या "डिस्को' ज्वारीचे करायचे तरी काय? असा प्रश्‍न ग्रासलेल्या बळिराजाकडून उपस्थित होत आहे. जे थोडेफार धान्य येणार आहे त्याला दर्जाच नसल्याने व्यापारी मातीमोल भावात घेत आहेत. दुसरीकडे शासनाच्या हमीभाव केंद्रातही या धान्याला थारा नाही. या पार्श्‍वभूमीवर शासनाने केंद्राच्या माध्यमातून हे सर्व धान्य हमीभावाने खरेदी करावे, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणावा, अशी मागणी जोर धरत आहे. 
गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे बहरलेल्या हंगामावर अक्षरशः नांगर फिरविण्याची वेळ उत्पन्नाचे इमले रचणाऱ्या शेतकऱ्यांवर आली आहे. कापलेल्या ज्वारी, बाजरीच्या कणसांना कोंब फुटले; तर उभ्या पिकांची यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. मका, सोयाबीनही मातीत गेले. ही विदारक परिस्थिती वाट्याला आल्याने शेतकरी बेजार झाला आहे. 

ज्वारी झाली "डिस्को' 
जिल्ह्यात खरीप हंगामात 29 हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली, तर 12 हजार हेक्‍टरवर बाजरीची पामेर फिरली. यंदा खरीप हंगाम कधी नव्हे एवढा बरसला होता. मात्र, बहरलेल्या या हंगामाला परतीच्या पावसाची नजर लागली. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन कापून ठेवले होते. परंतु परतीच्या पावसाने ते काढूच दिले नाही. त्यामुळे कापणी केलेल्या कणसांना कोंब फुटले; तर उभ्या असलेल्या पिकाची कणसे काळी पडली. त्यामुळे ज्वारी "डिस्को' झाली. 

धान्याला कवडीमोल भाव 
एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातात जे धान्य आले त्याला व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी नाडला जात आहे. ज्वारी "डिस्को' झाल्याने 1,200 ते 1,300 रुपये प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. मक्‍याची 800 ते 1000 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. सोयाबीन, बाजरीचीही दैना आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. 

हमीभावाने धान्य खरेदी करा 
शासनानाकडून हमीभावाने धान्य खरेदीसाठी केंद्र सुरू केली जातात. यावर्षीही जिल्ह्यात 15 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सध्या धान्याची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या केंद्रात फक्त एफएक्‍यू दर्जाचा माल खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने खराब झालेल्या धान्याला या केंद्रात शासन नियमानुसार खरेदी केले जाणार नाही. सध्याचे चित्र पाहिले तर सर्व धान्याचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे या केंद्रात धान्य येईल कोणते? त्यामुळे शासनाने परतीच्या पावसाने खचलेल्या शेतरऱ्यांना धीर देण्यासाठी हमीभाव केंद्रातून सरसकट सर्व धान्य खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

सरसकट धान्य खरेदीसाठी नेत्यांनी दबाव आणावा 
परतीच्या पावसाने धान्याचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव केंद्रात शासन निर्णयानुसार हा माल खरेदी केला जाणार नाही, तर खासगी बाजारपेठेत हा माल मातीमोल भावात खरेदी केला जाईल. शासनाच्या हमीभावानुसार ज्वारीचा 2,500, बाजरी 2000, मका 1,760, तर सोयाबीन 3,710 रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्याचा माल हमीभाव केंद्रात खरेदी झाल्यास काही प्रमाणात का असेना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी बांधावर येऊन शेतकऱ्यांचे जे अश्रू पाहिले त्याची जाण ठेवून सरसकट सर्वच धान्य हमीभावाने खरेदी केले जावे, यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्‍यक आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना कोरडे आश्‍वासन देण्यापेक्षा शाश्‍वत मागणी शासनाकडे लावून धरावी, अशी अपेक्षा आहे. 

शासनाचे जिल्ह्यात 15 ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. केंद्रावर फक्त एफएक्‍यू दर्जाचाच माल खरेदी केला जाणार आहे. तसे शासनाचे परिपत्रक आहे. 
- परिमल साळुंखे, मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news disco jowar farmer hamibhav