धन्याच्या रक्षणासाठी राजा-राणी श्‍वानांचा कोब्राशी संघर्ष,सरस्वतीवाडीतील घटना

मोठाभाऊ पगार
गुरुवार, 4 जुलै 2019

देवळा : कुत्र्यांची इमानी, प्रामाणिक म्हणूनच पूर्वीपासून ओळख. आपल्या मालकाचे धन, संपत्ती वाढो आणि मला रक्षणाची संधी मिळो, असे काहीसे गंमतीने म्हटले जात असले, तरी ते खरंच आहे. याच इमानी, प्रामाणिकपणे मालकाचे काम करणारे, मालकांसाठी जीव की प्राण देणारे श्‍वान आपण कथा, चित्रपटांतून अनेकादा ऐकले असतील, पाहिले असतील. कलियुगात एकमेकांविषयी प्रेम व निष्ठा लोप पावत आहे. एकमेकांचा जिवावर उठणारी माणसे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात.

देवळा : कुत्र्यांची इमानी, प्रामाणिक म्हणूनच पूर्वीपासून ओळख. आपल्या मालकाचे धन, संपत्ती वाढो आणि मला रक्षणाची संधी मिळो, असे काहीसे गंमतीने म्हटले जात असले, तरी ते खरंच आहे. याच इमानी, प्रामाणिकपणे मालकाचे काम करणारे, मालकांसाठी जीव की प्राण देणारे श्‍वान आपण कथा, चित्रपटांतून अनेकादा ऐकले असतील, पाहिले असतील. कलियुगात एकमेकांविषयी प्रेम व निष्ठा लोप पावत आहे. एकमेकांचा जिवावर उठणारी माणसे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, आजही धन्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी अतिविषारी कोब्राशी झुंज देत त्याला संपविल्याची खात्री झाल्यानंतरच आपले प्राण सोडणारे हे श्‍वान अर्थात, "कुटुंबाच्या रखवालदारा'ची ही इमानदारी पाहून सलामच करावासा वाटतो. सरस्वतीवाडी (ता. देवळा) येथे घडलेली ही घटना आजच्या युगात निःशब्द करून जाते. 

    देवळा- सटाणा रोडवरील माळवाडी फाट्यापासून हाकेच्या अंतरावर सरस्वतीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेधणेवस्ती आहे. तेथील तरुण उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मेधणे आपल्या कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. त्यांनी शेताच्या राखणीसाठी डॉबरमॅन या जातीची दीड वर्षे वयाची दोन कुत्री पाळली असून, या जोडीच्या भरवशावर ते मळ्यात राहतात. सोमवारी (ता. 1) पहाटे चारला त्यांच्या शेतातून दुर्मिळ असलेला, पण अतिविषारी कोब्रा बिळातून बाहेर आला. तो जवळच असलेल्या मेधणे यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न करत असताना, राजा व राणी या दोन्ही श्‍वानांची नजर त्याच्यावर गेली. हा साप जर घरात गेला तर आपल्या धन्याला व त्याच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका होऊ शकतो,

या उपजत जाणिवेने या दोन्ही श्‍वानांनी क्षणाचाही विलंब न लावता या सापाकडे धाव घेतली. लहानपणापासूनच माणसांत वावरलेल्या या दोन्ही मुक्‍या जिवांना लढाईचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी सापाला समोरासमोर आव्हान दिले आणि यातच घात झाला. सापाने दोघांवर आपल्या विषारी दातांनी हल्ला केला. दोघा श्‍वानांनी सापाला प्रतिकार करीत त्याचे दोन तुकडे केले. सापाचा प्रतिकार संपल्याचे पाहतच राजा-राणीने मेधणे कुटुंबीयांकडे नजर टाकत आपला प्राण सोडला. श्‍वानांच्या हालचालींनी जागे झालेल्या मेधणे कुटुंबीयांना श्‍वान गतप्राण झाल्याचे पाहून मानसिक धक्का बसला. एका डोळ्यांत आसू, तर दुसऱ्या डोळ्यात दोघांविषयी असलेला कृतज्ञ भाव प्रकट झाला. सारे कुटुंबीय आपल्या राजा-राणीच्या जाण्याने निःशब्द झाले. 

मुक्‍या प्राण्यांना जर आपण जीव लावला तर ती आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले रक्षण करण्यासाठी सिद्ध असतात, हेच या प्रसंगावरून दिसते. 
- प्रवीण मेधणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news doberman dog