Loksabha 2019 डॉ. सुभाष भामरेंची वाट बिकट;  बागलाण परिसरात भाजपची होणार कोंडी 

अंबादास देवरे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सटाणा ः धुळे लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीत बागलाण विधानसभा मतदारसंघात खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची वाट गत निवडणुकीच्या तुलनेत खडतर होत चालल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

सटाणा ः धुळे लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीत बागलाण विधानसभा मतदारसंघात खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची वाट गत निवडणुकीच्या तुलनेत खडतर होत चालल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अमरिशभाई पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी भाजपही पूर्णपणे भरात असलेल्या मोदी लाटेवर तरंगत होता. डॉ. भामरेंनाही त्या लाटेत बागलाण विधानसभा मतदारसंघातून 14 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. तेव्हा डॉ. भामरे यांच्यासाठी मराठा कार्डचा फॅक्‍टरही जोरात चालल्यानेच त्यांना मताधिक्‍य मिळाले. किंबहुना मराठा समाज संपूर्ण ताकदीने डॉक्‍टरांच्या मागे एकवटल्याने कॉंग्रेसचे पटेल यांना अपेक्षेप्रमाणे मते मिळाले नाहीत. मात्र, या निवडणुकीत डॉ. भामरे यांच्यासमोर कॉंग्रेसनेही मराठा कार्ड फेकून डाव मांडला आहे. मराठा समाजाचे आमदार कुणाल पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी देऊन मराठा मतांचे विभाजन करून डॉ. भामरे यांच्यासमोर अडचणी उभ्या केल्या आहेत. याची प्रचीती गत विधानसभा निवडणुकांमध्येही आली होती. विधानसभा निवडणुकीतही प्रचंड प्रमाणात मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दीपिका चव्हाण यांनी भाजपच्या दिलीप बोरसे यांचा पराभव केला होता. 

श्रेयवादात अडकली कामे 
डॉ. भामरे खासदार झाल्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न डॉ. भामरे यांनी केला. मात्र श्रेयवादात ही कामे अडकली. याचा फटकाही डॉ. भामरे यांनाच बसण्याची शक्‍यता आहे. आमदार दीपिका चव्हाण व मंत्री भामरे यांच्यातील श्रेयवादाची लढाई, हाही तालुक्‍यात आजही चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: marathi news dr.bahamre