बनावट क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षी 2017मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अर्जासोबत बनावट नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणाऱ्या महिला उमेदवाराविरुद्ध सरकारवाडा पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी "सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाने चौकशी समिती नेमली होती. शीतल संपत गायकवाड असे संशयित महिला उमेदवाराचे नाव आहे. 

नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षी 2017मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अर्जासोबत बनावट नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणाऱ्या महिला उमेदवाराविरुद्ध सरकारवाडा पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी "सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाने चौकशी समिती नेमली होती. शीतल संपत गायकवाड असे संशयित महिला उमेदवाराचे नाव आहे. 
नाशिक शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गेल्या वर्षी मार्च-एप्रिल 2017 मध्ये रिक्त पोलिस शिपाई व बॅण्डपथकातील पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी संशयित शीतल संपत गायकवाड (रा. पोलीस मुख्यालय लाईन नंबर 3, गंगापूर रोड, नाशिक) हिने अर्ज केला होता त्यानुसार तिचा रोल नंबर 22020600000038, चेस्ट क्रमांक 13104 असा होता. सामाजिक व समांतर आरक्षण असल्याने त्याचा बनावट पद्धतीने फायदा करून घेण्यासाठी तिने आपल्या शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अर्जाला जोडले. उमेदवारांच्या अर्जाच्या तपासणीच्या लिस्टमध्ये तिच्या अर्जासोबत जोडलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनावट व खोटे असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महिला पोलीस शिपाई पदावर भरती होण्यासाठी तिने बनावट नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तयार करून शासनाला सादर करून फसवणूक केली.

"सकाळ'ने केला पाठपुरावा 
संशयित शितल गायकवाड हिने बनावट क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्याचा दावा शुभांगी आंबेकर या उमेदवाराने केला होता. त्यासंदर्भात तिने पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांकडे पुरावे सादर करीत चौकशीची मागणी केली होती. परंतु त्याचीही फारशी दखल न घेतल्याने याप्रकरणी "सकाळ'मधून वृत्त 18 मार्च रोजी प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत मुख्यालयाच्या उपायुक्त माधुरी कांगणे यांनी सहाय्यक आयुक्त टी.एन. तांदळे यांच्यामार्फत चौकशी समिती नेमली. त्यामध्ये तहसिल विभागाकडून पुन्हा संशयित शितल गायकवाड हिच्या क्रिमीलेअर प्रमाणपत्राची फेरतपासणी केली असता, त्यामध्ये ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. ते वृत्तही 29 मार्च रोजी प्रसिद्ध झाले आणि गुन्हा दाखल करण्याची शक्‍यताही व्यक्त केली होती. दरम्यान, संशयित महिलेचा नातलग पोलीस दलात असल्याने गुन्हा दाखल होण्यास दिरंगाई होत होती. परंतु अखेर "सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल झाला. 
 

Web Title: Marathi news duplicate criminal certificate