LOKSABHA 2019-आघाडीच्या थंड नेत्यांमुळे  धनराज महाले चाचपडतायत 

residentional photo
residentional photo

पिंपळगाव बसवंत ः उमेदवार कोण, यावरून उत्सुकता शिगेला पोचलेल्या दिडोरी मतदारसंघातील मतदारांसमोर आता चित्र स्पष्ट झाले आहे. लढत चौरंगी असली, तरी मुख्य सामना भाजपच्या डॉ. भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले यांच्यात असून, प्रचाराने वेग घेतल्याने रणधुमाळीला सुरवात झाली. डॉ. पवार यांची बलस्थाने महाले यांच्याविरोधात वरचढ ठरताना दिसत असली, तरी काही उणिवा बाजूला करण्याचे आव्हान डॉ. पवार यांच्यापुढे आ वासून उभे आहे. 

गेली दहा वर्षे दिंडोरी लोकसभा निवडणुकीचे वलय खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याभोवती फिरले. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकत असतानाही महाले यांच्यासाठी हा मतदारसंघ अजून सुरक्षित झालेला दिसत नाही. मतदारांमधील अंडरकंरट तरी सध्या तेच सांगत आहे. डॉ. पवार व महाले या दोघांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिल्याने दलबदलू उमेदवार हा मुद्दा आता बाजूला पडलेला दिसतो. पण महाले यांना शिवसैनिकांची मदत होईल हा स्वच्छ हेतू ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश दिला गेला. तो हेतू अंगलट येण्याची चिन्हे आहेत. शिवसैनिकांमध्ये काहीशी संतापाची भावना महाले यांच्याविरोधात पुढे येत आहे. याउलट डॉ. पवार यांना पक्षाने डावलले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूतीच्या लाटा उसळू लागल्या. 

मोदींच्या संभाव्य सभेने आघाडीच्या गोटात धडकी 

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेसह युतीच्या घटक पक्षांसमवेत पिंपळगावला डॉ. पवार यांच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळ वाढवीत धडाकेबाज सुरवात केली. निवडणुकांमधील चाणक्‍य अशी प्रतिमा झालेले मंत्री महाजन यांनी दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक अंगावर घेतल्याने आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल आहे. येत्या पंधरा दिवसांत पिंपळगाव बसवंतला पंतप्रधान मोदींच्या संभाव्य सभेच्या वृत्ताने आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच महाले चाचपडताना दिसत आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी वज्रमूठ न आवळल्याने डॉ. पवार यांचे अलगद एक पाऊल पुढे पडलेले दिसते. 

डॉ. भारती पवार 

बलस्थाने 

*पिंपळगावच्या सभेनंतर भाजपसह शिवसेना व युतीच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचा सोडलेला संकल्प 
*गेली साडेचार वर्षे मतदारसंघात कायम संपर्कात 
*उच्चशिक्षित व अभ्यासू प्रतिमा 
*पंतप्रधान मोदींची सभा झाल्यास स्थिती अधिक पूरक होणार 

उणिवा 

खासदार चव्हाण यांचा उपद्रव थांबविण्यात अपयश 
*युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ओळखीचा अभाव 
*होमपीच कळवणमध्ये गृहकलह व माकपचे जे. पी. गावित यांचा शिरकाव थांबविण्याचे आव्हान 

धनराज महाले 

बलस्थाने 
*माजी खासदार (कै.) हरिभाऊ महाले यांचे वारसदार 
*तीन विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीकडे 
*शेतकऱ्यांमध्ये भाजपविरोधी वातावरण 

उणिवा 
*झंझावात उभा करण्यात अद्याप अपयशी 
*दिंडोरी वगळता इतर तालुक्‍यांत शिवसैनिकांकडून धडा शिकविण्याची भाषा 
*माकप व वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष मतांच्या विभागणीची शक्‍यता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com