#BATTLE FOR NASHIK नाशिकचे प्रकल्प पळविले कुणी? राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

 

 

नाशिक ः महापालिकेपासून राज्यात अन्‌ केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीमुळे विकास होईल, असे नाशिककरांना वाटत होते. पण दत्तक बापाने नाशिकच्या विकास प्रकल्पांची पळवापळवी केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंत जाधव आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. 
श्री. जाधव म्हणाले, की पालकमंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे स्वयंघोषित पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकीदाराची भूमिका बजावण्याऐवजी नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली. नाशिकच्या तोंडातील विकासाचा घास हिरावून घेताना मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या आपल्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींना "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' दिला. युतीच्या लोकप्रतिनिधींना तोंड उघडण्याची संधी दिली नाही. आता हीच मंडळी "खोटे बोला, पण रेटून' या नीतीची अवलंब करत धूळफेक करत आहेत. 

गुजरातला पाणी देण्याचा घाट 
नाशिक-नगर-मराठवाडा यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी दमणगंगा, पिंजाळ व नार-पार नद्यांचे समुद्राला जाणारे 157 दशलक्ष घनफूट पाणी अडवून गोदावरी व गिरणा खोऱ्यात टाकण्याची शिफारस चितळे समितीने केली, पण हे पाणी गुजरातला देण्याचा घाट घातलाय. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधून पाणी नसल्याचे कारण देत नाशिकला वगळले, असे सांगून ते म्हणाले, की नाशिकचा 40 वर्षांचा पाणीप्रश्‍न सुटणाऱ्या किकवी धरणाच्या निविदा रद्द करण्यात आल्या. जलविज्ञान कक्ष बंद करण्यात आला. एकलहरे औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या. मराठवाडा-विदर्भासाठी स्वतंत्र वीजदर लावून नाशिकची वीज महाग केली. शिवाय नाशिकचा समावेश कोकण विभागात करून मुख्यालय हलविले. विद्यापीठीय शिक्षणाचा खेळखंडोबा केला. नागपूरच्या आयुष विद्यापीठासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लचका तोडण्याचा घाट घातला गेला. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी शाखा नागपूरला नेण्याचा प्रयत्न संघटनांच्या विरोधामुळे थांबला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचा विषय मार्गी लावलेला नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रश्‍नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. 

राष्ट्रवादीने उपस्थित केलेले मुद्दे 
0 नायपर संस्था नाशिकमध्ये व्हावी, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून मुख्यमंत्र्यांनी नागपूरला नेली 
0 समृद्धी कुणाची?, नाशिकची की नागपूरची? नाशिकला "बायपास' करून वंचित ठेवण्यासारखे आहे 
0 राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे चित्तेगाव फाट्याचे कार्यालय दिल्लीला नेला 
0 नाशिकचे प्रादेशिक कार्यालय मुंबईला स्थलांतरित केले 
0 अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूरला हलविले 
0 नाशिकच्या बोटक्‍लबमधील बोटी आणि आदिवासी क्रीडा प्रबोधिनी पळवली

Web Title: marathi news eclips