esakal | नाथाभाऊंचा प्रवेशाने धुळे- नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse rashtrwadi entry

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायाने कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्यातून या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला पूर्व वैभव प्राप्त होऊ शकेल, असा आशावाद राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्तविला जात आहे.

नाथाभाऊंचा प्रवेशाने धुळे- नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : धुळे -नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली आहे. त्यातच धुळे येथील राष्ट्रवादीची कमान माजी आमदार अनिल गोटे यांनी सांभाळली. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचे वर्चस्व बऱ्यापैकी आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. मात्र काही दिवसापासून डॉ. अभिजित मोरे यांनी नेतृत्व स्वीकारल्याने राष्ट्रवादीची बांधणी जोरात सुरू झाली आहे. अशा स्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायाने कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्यातून या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला पूर्व वैभव प्राप्त होऊ शकेल, असा आशावाद राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्तविला जात आहे. 
आघाडी शासनाचा काळापासून नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिपद कायम राहिले आहे. राष्ट्रवादीच्या कोठ्यातील आदिवासी विकास विभागाचे मंत्रिपद तत्कालीन मंत्री .डॉ. विजयकुमार गावित यांना देऊन विकासाचा योजनांचा वर्षावच जिल्ह्यात झाला होता.त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला होता.मात्र डॉ. गावितांचे पक्षांतर व नंतर सत्ता गेल्याने पक्षाकडे अनेकांनी पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यात राजेंद्रकुमार गावित यांनी संघर्ष करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्यात एकही जागा न सोडल्याने नाराज होऊन श्री. गावित यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीची वाताहत झाली होती.मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे यांच्यासोबत जिल्ह्याची राष्ट्रवादीची कमान पदाची आशा न बाळगता सांभाळली. आज ते जिल्हाध्यक्ष आहेत.त्यांनी सर्वांना सोबत घेत पक्ष बांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. 

नाथाभाऊंमुळे बळ 
नाथाभाऊ हे राज्याचे नेते आहेत. त्यांची राज्यावर कमांड आहे. कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे त्यांना केवळ जळगावपुरते सीमित राहून चालणार नाही. धुळे -नंदुरबार जिल्ह्यातही त्यांचा कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे. एवढेच काय त्यांचा समर्थनासाठी सूडाचा राजकारणाला बळी पडावे लागले तरी त्यांचा सोबत राहिलेले कार्यकर्ते आहेत. त्याचे जिवंत उदाहारण धुळे येथील माजी आमदार अनिल गोटे व तळोद्याचे उदेसिंग पाडवी आहेत.खडसे समर्थक म्हणून आपला छळ झाल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे.त्यामुळे नाथाभाऊ जेथे, कार्यकर्ते तेथे असे समीकरण आहे. त्यामुळे जळगावसोबत धुळे -नंदुरबार जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते पुन्हा एकवटतील व त्यांचा सोबत राष्ट्रवादीत संघटित होतील. त्यामुळे आपशूकच राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. 

तु जा,मी येतोच 
एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी श्री. खडसे यांचा पुण्यातील जमिनी प्रकरणी महसूलमंत्री पदाचा राजीनामा घेतल्यावर जाहीर पाठिंबा दर्शवीत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे खडसे समर्थक म्हणून रूटींग आमदार असतांनांही वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुऴे वर्षभर शांत असलेले उदेसिंग पाडवी यांनी गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा म्हणण्यानुसार खडसेसाहेबांनीच मला सांगितले होते, तु जा, मी आलोच. म्हणून आपण राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केला असल्याचे चार दिवसापूर्वी बोलतांना जाहीर केले होते 

संपादन ः राजेश सोनवणे