अंजनी प्रकल्पात अद्याप मृत जलसाठा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

एरंडोल ः पावसाळा सुरु होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्यामुळे अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा असून तालुक्यातील भालगाव, खडके, पद्मालय येथील तलाव देखील कोरडेठाक पडले आहेत. यामुळे आगामी काळात तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

एरंडोल ः पावसाळा सुरु होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्यामुळे अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. प्रकल्पात अजूनही मृत जलसाठा असून तालुक्यातील भालगाव, खडके, पद्मालय येथील तलाव देखील कोरडेठाक पडले आहेत. यामुळे आगामी काळात तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 
गिरणा नदीवरील जामदा बंधाऱ्यावरुन वाहून जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून पारोळा ब्राँचद्वारे अंजनी प्रकल्पात सोडून पुनर्भरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यात यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी सर्व नदी व नाले अद्याप कोरडे आहेत. पावसाळा सुरु होऊन सुमारे दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून जोरदार पावसाअभावी अंजनी प्रकल्पाच्या जलसाठ्यात कोणतीही वाढ झाली नाही. सद्यःस्थितीत प्रकल्पात मृत जलसाठा असून शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. भालगाव येथील पाझर तलाव कोरडा असून खडके येथील तलावात तीस टक्के जलसाठा झाला आहे. पद्मालय येथील मूगपाठ तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झालेली नसल्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा व अन्य गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत पावसाळ्यात देखील शहरात आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अंजनी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाला तरच अंजनी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होऊ शकते. अंजनी प्रकल्पात असलेला अत्यल्प जलसाठा लक्षात घेऊन जामदा बंधाऱ्यावरुन वाहून जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून प्रकल्पात सोडण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीच माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील यांच्याकडे तर आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. आजी- माजी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे. जामदा बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे प्रकल्पाचे पुनर्भरण केल्यास तालुक्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावर्षी प्रकल्पातून हजारो ब्रास गाळ उपसण्यात आळा असल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अंजनी प्रकल्पाचे पुनर्भरण केल्यास त्याचा लाभ परिसरातील विहिरींना होणार आहे. 

मुसळधार पावसाची प्रतीक्षा 
तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून पिकांची परिस्थिती देखील चांगली आहे. तालुक्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ७० टक्के पाऊस झाला असला तरी नदीनाले अद्याप कोरडेच आहेत. अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाची गरज असून शेतकरी देखील जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erndol anjani praklp mrut satha