फागणे- नवापूर महामार्गाची ११९८ कोटींची निविदा 

फागणे- नवापूर महामार्गाची ११९८ कोटींची निविदा 

नवापूर : नागपूर- सुरत महामार्गावरील महाराष्ट्र हद्दीतील फागणे ते बेडकी(नवापूर) दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या शिल्लक राहिलेल्या कामाची निविदा काढण्यात आली असून मार्चअखेर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १३ डिसेंबरला या राहिलेल्या कामाची निविदा वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. येत्या २९ जानेवारी २०२० पर्यत निविदा भऱण्याची मुदत असून त्यानंतर प्रक्रिया होऊन मार्चअखेरपर्यत काम सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे ११९८ कोटींची ही निविदा आहे. दोन वर्षाची मुदत या कामासाठी देण्यात आली आहे.

प्राधिकरणाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध टेंडरनुसार महामार्गाच्या फागणे येथील किलोमीटर क्रमांक ५१० ते महाराष्ट हद्दीतील बेडकी, किलोमीटर क्रमांक ६५० अशा एकूण १४० किलोमीटरचे हे काम असेल. यातील पन्नास टक्के काम जवळपास पूर्ण झाले असून निधीअभावी हे काम थांबले होते. सुरुवातीला एल ॲड टी कंपनीने हे काम देण्यात आले होते, मात्र वाढीव रकमेवरून एल ॲन्ड टी ने नकार दिल्याने हे काम आयएपएलएस या कंपनीला देण्यात आले. मात्र त्या कंपनीनेही हे स्वतः न करता इतर छोट्या कंपन्यांना जसे जीएचव्ही ला हे काम विभागून दिले. मात्र आयएफएलएसने जीएचव्ही कंपनीला पुरेशी देणी न दिल्याने काम रखडत गेले अन बंद पडले. तेव्हापासून हे काम बंदच आहे. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतूक म्हणजे मरणयातना असे समीकरण झाले आहे.  
आता प्राधीकरणाने राहिलेल्या कामासाठी नवीन निविदा प्रसिध्द केली आहे. तेरा डिसेंबरला वेब साईटवर प्रसिध्द झालेली ही निविदा येत्या २९ डिसेंबरपर्यत निविदा भरता येणार असून जानेवारीत ती उघडण्यात येईल. त्यामुळे मार्चअखेर चौपदरीकरणाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

दुरूस्तीसाठी दोन कोटी?
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने दुरूस्तीसाठी दोन कोटी रूपये मंजूर केले आहेत. ते काम स्थानिक स्तरावरील कंत्राटदाराला देण्यात आले आहे,मात्र अजूनही हे काम सुरू झालेले नाही. मध्यंतरी दोन दिवस विसरवाडी ते कोंडाईबारीदरम्यान हे काम सुरू झाले होते, मात्र ते पुन्हा बंद पडले आहे, त्यामुळे दुरूस्तीचे काम कधी सुरू होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आमदार नाईकांनी मांडली व्यथा
नागपूर सुरत या महामार्गावरील नवापूर ते फागणेदरम्यानचे काम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. अर्धवट सोडलेले हे काम आणि नंतरची अतिवृष्टी यामुळे या रस्त्यावर भलेमोठ खड्डे पडल्याने रस्त्याने वाहतूक काही काळासाठी बंदही करण्यात आली होती. या दुरवस्थेसंदर्भात आमदार शिरीषकुमार नाईक यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली व वस्तुस्थिती विशद केली. संबंधित विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत निविदेबबात माहिती देत लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्‍वासित केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com